काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रुजली – राहुल गांधी

1137

काँग्रेसने खऱ्या अर्थाने देशातील सर्वच घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मना-मना काँग्रेसची विचारधारा रुजलेली आहे. परंतु, भारतीय जनता पक्ष काँग्रेसला मागील पन्नास, साठ वर्षात काय केले असा प्रश्न विचारत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने देशाची अर्थव्यवस्था बरबाद केली असून अशा सरकारला सत्तेपासून बाजूला ठेवावे असे आवाहन काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांनी केले.

औसा येथील महा आघाडीच्या वतीने मराठवाड्यातील पहिल्या प्रचार सभेत संबोधित करताना ते बोलत होते. खासदार राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशपातळीवरचे मुद्दे घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेच्या मूळ प्रश्नाला बगल दिली आहे. गरिबांची लूट करून धनिकांचे खिसे भरण्याचे काम सत्ताधारी भाजप करीत आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या नावावर गरिबांची लूट करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत घटनेचे 370 कलम व जम्मू-काश्मीरची मुद्दे घेऊन तळागाळातील जनतेचे लक्ष विचलित करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार उद्योगपतींचे चोचले पुरवून गरीबांची फसवणुक करीत आहे. देशभरातील सुमारे 2 हजार कारखाने बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात नोकर कपात झाली आहे. परिणामी बेरोजगारीचे मोठे संकट देशासमोर निर्माण झाले असून शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केले.

ते म्हणाले, हजारो कोटी रुपयांचे उद्योगपतींचे कर्ज व जीएसटी माफ करणाऱ्या सत्ताधारी सरकारला शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देता येत नाही. अच्छे दिन आले म्हणून जनतेची दिशाभूल केली जात आहे परंतु अच्छे दिनची घोषणा हवेतच विरली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळाला नाही शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले नाही. नवीन रोजगार निर्मिती झाली नाही. त्यामुळे बेरोजगारीचे देशातील युवा पिढी बरबाद झाली आहे. येत्या काळात विनाशाच्या वाटेवर जात असलेला देश वाचवायचा असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीच्या हाती सत्ता देऊन महाराष्ट्रात परिवर्तन घडवा, असे आवाहन युवा नेते खा राहुल गांधी यांनी केले.

कॉंग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, काँग्रेस पक्षाने देशात कृषी, विज्ञान-तंत्रज्ञान, सिंचन, उद्योग, शिक्षण यासह सर्वच क्षेत्रात उतुंग प्रगती केली आहे. साखर उद्योगासह विविध उद्योगातून तरुणांच्या हाताला काम देण्याचे कार्य केले. देशातील विविध क्षेत्रातील प्रगती केवळ मागच्या पाचच वर्षात झाली आहे का असा प्रश्न उपस्थित करून शिवराज पाटील चाकूरकर यांनी सरकारला धारेवर धरले. यावेळी मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, चारुलता टोकस, आमदार अमित देशमुख, मधुकर चव्हाण यांचीही भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर युवानेते अ‍ॅड राजीव सातव, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण तुळजापूरकर, आमदार बसवराज पाटील, अशोकराव पाटील निलंगेकर, दिलीप भालेराव उमरगा, लातूर ग्रामीण श्रीमती चारुलता टोकस जिल्हा बँकेचे चेअरमन अ‍ॅड श्रीपतराव काकडे, नगराध्यक्ष अफसर शेख यांचा सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या