प्रियांका वाराणसीतून लढली असती तर, मोदी 2-3 लाख मतांनी हरले असते – राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता एक मोठा दावा केला आहे. आपली बहीण प्रियांका गांधी वाड्रा ही वाराणसीमधून निवडणूक लढली असती तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दारूण पराभव झाला असता, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांची रायबरेलीत सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर मतदारांचे आभार मानन्यासाठी राहुल गांधी यांची ही सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी रायबरेलीसह उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीला मोठे यश मिळाले. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे.

प्रियांका वाराणसीमधून निवडणूक लढली असती तर आज हिंदुस्थानचे पंतप्रधान दोन ते तीन लाख मतांनी पराभूत झाले असते. मी अहंकारातून बोलत नाही. याचे कारण म्हणजे पंतप्रधानांना हिंदुस्थानच्या जनतेने दिलेला संदेश. आम्हाला तुमचे राजकारण पटलेले नाही आणि आम्ही त्याविरोधात आहोत. आम्ही द्वेष आणि हिंसेच्या विरोधात आहोत, हा संदेश जनतेने दिल्याचे राहुल गांधी म्हणाले.

‘जनतेचे आभार’

काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते आणि अमेठी आणि रायबरेलीतील जनतेने आम्हाला विजयी केले, त्याबद्दल आभार मानतो. यावेळी काँग्रेस अमेठी, रायबरेली, उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देशात एकजुटीने लढली. यावेळी समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही काँग्रेस नेत्यांसोबत मिळून निवडणूक लढवली, असे ते पुढे म्हणाले.

अमेठीत किशोरी लाल शर्मा, रायबरेलीत मला आणि उत्तर प्रदेशात ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांचा मोठा विजय झाला. यूपीने संपूर्ण देशाचे राजकारण बदलले आहे. संविधानाला हात लावाल तर तुमचे काय हाल होतील, हा संदेश जनतेने निकालातून दिला आहे. मोदी संविधानासमोर नतमस्तक झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. हे देशाच्या जनतेने केले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.