काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष? राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पाणीपत झाल्यापासून पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याच्या चर्चा सुरू आहेत. राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याने काँग्रेसला गांधी घराण्याव्यतिरिक्त नवीन अध्यक्ष मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 2019 ची लोकसभा निवडणूक लढती. 2014 प्रमाणे या निवडणुकीतही काँग्रेसचा दारूण पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 52 जागांवर समाधान मानावे लागले. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 44 मिळाल्या होत्या.

राफेल करारात घोटाळा झाला; भूमिकेवर राहुल गांधी ठाम

गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दोन्ही सभागृहातील अभिभाषणानंतर पत्रकारांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रश्न विचारले. काँग्रेसचा आगामी अध्यक्ष कोण असेल असा प्रश्न त्यांना विचारला असता, याचा निर्णय मी नाही तर पक्ष घेईल असे राहुल गांधी म्हणाले. यामुळे राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसत आहे.

काँग्रेस कार्यकारिणी समितीही आपल्या मतावर ठाम
एककडे राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी समितीही राहुल गांधी पदावर कायम राहतील या आपल्या मुद्द्यावर ठाम आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही याआधी राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहील असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली होती.