NEET-UG Row : …तोपर्यंत परीक्षांचे पेपर फुटत राहणार; राहुल गांधी यांचा भाजपसह RSS वर निशाणा

NEET आणि NET परीक्षेच्या घोटाळ्यावरून काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी युद्ध रोखू शकतात. पण पेपरफुटीचे प्रकार थांबवू शकत नाही, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

भारत जोडो न्याययात्रेत आम्ही मणिपूर ते महाराष्ट्र असा प्रवास केला. या दरम्यान रस्त्यात अनेक तरुणांनी आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या. हिंदुस्थानमध्ये सतत पेपरफुटीच्या घटना घडत आहेत, असे तरुणांनी सांगितले. NEET पेपर आणि NET चे पेपरफुटले आहेत. यातील NET ची परीक्षा रद्द झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबवले होते, असे सांगितले जाते. इस्रायल आणि गाझामधील लढाई नरेंद्र मोदी यांनी रोखल्याचे सांगण्यात येते. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने हिंदुस्थानमध्ये पेपरफुटीच्या ज्या घटना घडत आहेत, त्या नरेंद्र मोदी का रोखत नाही की त्यांना थांबवायच्या नाहीत? असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधी हल्लाबोल केला आहे.

पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे हिंदुस्थानमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थी कित्येक महिने अन् वर्षभर अभ्यास करतात. या परीक्षा विद्यार्थ्यांचे भवितव्य आहेत. पण विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात आहे. मध्य प्रदेशात व्यापमं घोटाळा झाला. आता तो व्यापमं घोटाळा नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार संपूर्ण देशात पसरवण्याचे काम करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

हिंदुस्थानमधील मीडिया कंपन्यांसह अनेक सरकारी आणि इतर संस्थांमध्ये कब्जा करण्यात आला आहे. असाच प्रकार शिक्षण संस्थांमध्ये होत आहे. सर्वच्या सर्व कुलगुरूपदांवर, शिक्षण संस्थांवर भाजप आणि भाजपच्या पालक संघटने (आरएसएस) च्या लोकांची कब्जा केला आहे. पेपरफुटीच्या घटनांमागे हेच मोठे कारण आहे. जोपर्यंत त्यांना पदांवरून हटवले जात नाही, तोपर्यंत पेपरफुटीच्या घटना घडतच राहतील. शिक्षण संस्था आणि प्रमुख शैक्षणिकपदांवर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नियुक्त्या झाल्या आहेत. हा देशद्रोह आहे. कारण शिक्षण संस्था या देशाचे भवितव्य आहेत. हिंदुस्थानच्या तरुणांना, विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतो, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

एक परीक्ष रद्द केली आहे. चौकशी सुरू आहे. आता दुसरी परीक्षा रद्द होणार की नाही माहिती नाही. पण कोणीतरी या सर्व प्रकाराला जबाबदार आहे. त्यांना पकडलं गेलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. हिंदुस्थानमध्ये अनेक प्रामाणिक लोक आहेत. त्यांना परीक्षांची जबाबदारी दिल्यास पेपरफुटीच्या घटना घडण्याची शक्यता कमी आहे. पण तुम्ही राजकीय आणि विचारधारेच्या आधारावर नियुक्त्या करत असाल, तर पेपरफुटीच्या घटना सुरूच राहतील, असे राहुल गांधी म्हणाले.

मोदी सरकारने कितीही क्लीन चिट दिली तरही त्यांची विश्वासार्हता ‘झीरो’ आहे. सर्वांना माहिती आहे, पेपरफुटीचे एपिसेंटर मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आहेत. भारत जोडो न्याययात्रेत सर्वाधिक तक्रारी या भाजप शासित राज्यांमधून आल्या होत्या. पेपरफुटीचे पहिले एपिसेंटर हे मध्य प्रदेश होते. तिथे 40-50 जणांची हत्या करण्यात आली. तेव्हापासून पेपरफुटीचे प्रकार सुरू झाले. मध्य प्रदेश आणि गुजरात ही राज्ये आमची प्रयोगशाळा आहेत, असे भाजप नेते म्हणतात. त्यांच्या प्रयोगशाळेतून हे प्रकार सुरू आहेत. हे देशभर पसरवले जात आहे. त्यात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

नरेंद्र मोदींनी आपले गुजरात मॉडेल देश पातळीवर आणले. त्यांची कॉन्सेप्ट होती मार्केटिंग-हजारो कोटींची मार्केटिंग आणि भीती दाखवणे. तपास यंत्रणांची भीती, माध्यमांची भीती आणि सरकारची भीती दाखवणे. मात्र आता लोक त्यांना घाबरत नाही. जा पहिले 56 इंचाची छाती होती ती आता 30-32 इंचाची झाली आहे. मोदींनी जो फुगा फुगवला गेला होता, त्याची हवाच निघून गेली आहे. यामुळे नरेंद्र मोदी आता टेन्शनमध्ये आले आहेत. कारण त्यांची काम करण्याची पद्धत ही लोकांना भीती दाखवण्याची आणि धमकवायची आहे. आता ती भीती गेली आहे. कारण वाराणसीत त्यांच्या कारवर कोणीतरी चप्पल फेकली होती, असा जोरदार टोला राहुल गांधी यांनी लगावला.