राहुल गांधींनी कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी व्हावे- उमा भारती

13
uma-bharti

सामना ऑनलाईन । बहराइच

उत्तर प्रदेशमधील निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या टीकेचा सूर टीपेला पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, राहुल गांधीची एकंदरीत नाटकं पाहता त्यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी व्हायला हवं. त्या नानपारा विधानसभा मतदारसंघातील शिवपूर इथे भाजपाच्या उमेदवार माधुरी वर्मां यांच्या प्रचारसभेत बोलत होत्या.

या सभेमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आणण्याचं मतदारांना आवाहन केलं. भाजपाची सत्ता उत्तर प्रदेशात आल्यास सहा महिन्यांत अखिलेश यादव, मायावती आणि गायत्री प्रजापतींसारख्या नेत्यांची बेनामी संपत्ती जप्त होईल, असं त्या म्हणाल्या. सपा आणि बसपाच्या नेत्यांवर टीका करताना त्या म्हणाल्या, की काळा पैसा बाळगणाऱ्यांनंतर आता बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांचे बुरे दिन येणार आहेत.

अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना त्या पुढे म्हणाल्या की, गुजरातच्या गाढवांची आठवण काढण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या बेनामी संपत्तीकडे लक्ष दयावं, कारण आता ती आता जप्त होणार आहे. अखिलेश सरकारमधील मंत्री गायत्री प्रजापती यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप आहे. गायत्री प्रजापती यांच्यासारख्या बलात्कार प्रकरणात अडकलेल्यांना समर्थन दिल्याने अखिलेश यांच्या चारित्र्यावरही उमा भारतींनी प्रश्न उपस्थित केला.

केंद्रसरकारने घेतलेल्या निर्णयांना राज्यसरकार पाठबळ देत नसेल तर, असं सरकार उत्तर प्रदेशसारख्या राज्यात असणं चुकीचं आहे, असं उमा भारती यांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या