मोदींच्या ‘नोटाबंदी’ने लघुउद्योजकांना देशोधडीला लावले, राहुल गांधी यांचा हल्ला

26

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नोटाबंदी’ने लघुउद्योजकांना देशोधडीला लावले, असे सांगतानाच मोदी हे केवळ 50 उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठीच काम करतात. त्यांनी एका कंपनीला 60 हजार कोटींचे कर्ज मिळवून दिले आहे, असा हल्ला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे केला. त्यांनी अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नोटाबंदी, जीएसटी आणि चुकीच्या धोरणांवरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जणू नारळच फोडला.

गुजरातमधील वस्त्रोद्योग बांगलादेशात स्थलांतर करू लागल्याचे काही दिवसांपूर्वी आपण पाहिले होते, असे सांगून ते म्हणाले की, मोदी यांनी 60 हजार कोटींचे कर्ज बडय़ा उद्योगपतींऐवजी गुजरातमधील लघुउद्योजकांना दिले असते तर त्यांना मोठा आधार मिळाला असता. पण लघुउद्योजक, छोटे गरीब शेतकरी या वर्गाची केंद्रातील भाजप सरकारला अजिबात काळजी नाही.

पंतप्रधान मोदी हे स्वच्छता अभियानाच्या आणि गंगेच्या शुद्धीकरणाच्या ऊठसूट बाता मारतात. पण देशातील सर्वात मोठा प्रश्न हा रोजगाराचा आहे. देशातील करोडो तरुणांना रोजगार कसा मिळणार, असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी केला.

‘जीएसटी’ची मूळ संकल्पना ही काँग्रेसचीच असून आमची जीएसटी आणि भाजपची जीएसटी यांच्यात जमीन अस्मानचे अंतर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या लागू असलेले सारे कर जीएसटीमध्ये समाविष्ट करावेत. मात्र नवी आकारणी 18 टक्केच असावी, 28 टक्के नव्हे. तसेच जीएसटीची अंमलबजावणी हळूहळू करावी, असे आमचे म्हणणे होते, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, भाजप सरकारला मात्र जीएसटीनिमित्त नाटकबाजी करण्यात रस होता. म्हणून मध्यरात्री सोहळा आयोजित करून जीएसटी लागू करण्यात आला. त्याचा छोटय़ा व्यापाऱयांना तडाखा बसला आहे.

125 जागा जिंकण्याचे लक्ष्य

गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत 180 पैकी 125 जागा जिंकण्याचे लक्ष्य काँग्रेसने निश्चित केले आहे, असेही राहुल गांधी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केले. भाजप आणि संघ परिवाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱया लढाऊ काँग्रेस कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘गुजरात मॉडेल’चा फोलपणा उघड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या ‘गुजरात मॉडेल’चा फोलपणा पुरता उघडा पडला आहे. त्याचा त्या राज्यातील तरुण असोत की शेतकरी आणि व्यापारी असोत की दुकानदार कोणालाही फायदा झालेला नाही. त्यामुळे मोदी आणि भाजपला गुजरात विधानसभा निवडणुकीतील निकालाची चिंता आता लागली आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या