टीडीपी-काँग्रेस आघाडीचे संकेत, राहुल गांधींनी आंध्र प्रदेशच्या मागणीला दिला जाहीर पाठिंबा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंध्र प्रदेशच्या लोकांना दिलेलं आश्वासन मोदींनी पूर्ण केलं नाही, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. एका दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी दिल्लीत दाखल झालेल्या चंद्राबाबू नायडू यांच्याशी भेट घेतल्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. चौकीदारही चोर है या आरोपांचाही पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

”पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील जनतेला दिलेलं आश्वासन पाळलं नाही. भ्रष्टाचारमुक्त देशाचं आश्वासन देऊन ते निवडून आले. मात्र, राफेल करारावरून तसं काहीही झालेलं दिसत नाही. तेव्हा चौकीदारही चोर है हेच सिद्ध होत आहे”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे 13 फेब्रुवारी रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. आंध्रचे विभाजन झाल्यानंतर आंध्र प्रदेशच्या पुनर्उभारणीत मोदी सरकारने कशी फसवणूक केली हे या उपोषणातून चंद्राबाबू हे दिल्ली दरबारी देशाला दाखविणार आहेत. या आंदोलनासाठी नायडू दिल्लीत दाखल झाले आहेत.

राहुल गांधी यांच्या टीकेचा सूर पाहता भविष्यात टीडीपी-काँग्रेस आघाडी होऊ शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या