मोदीजी, तुमच्यामुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची किंमत मध्यमवर्गालाच चुकवावी लागणार का? राहुल गांधी यांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरगरीबांसाठी राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोदी सरकारने मोठा झटका दिला आहे. या योजनेतील अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची संख्या 9 वरून थेट 4 वर आणण्यात आली आहे. यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

”गरीब-विरोधी आर्थिक धोरणांनी आणि तडजोड केलेल्या परराष्ट्र धोरणांमुळे मोदी सरकारने लाखो गरीब कुटुंबं आणि महिलांना लाकडाच्या विषारी धुराकडे पुन्हा ढकलले आहे. उज्ज्वला योजनेतील अनुदानित (subsidized) सिलिंडरांची संख्या 9 वरून कमी करून 4 करण्यात आली. त्यात भर म्हणून, गेल्या 3 महिन्यांत घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरच्या किमती 89 रुपयांनी वाढवण्यात आल्या – म्हणजेच, आधी किंमत वाढवायची, मग सबसिडी कमी करायची आणि गरिबांची चूल विझवायची”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

“स्थलांतरित मजुरांची जीवनवाहिनी असलेला 5 किलोचा सिलेंडरही 323 रुपयांनी महाग केला – मग त्याने कमवायचे काय, खायचे काय आणि वाचवायचे काय? अब्जाधीश मित्रांचे लाखो-करोडोंचे कर्ज माफ करायचे आणि गरिबांच्या पदरात स्वतःच्या अपयशाचे बिल टाकायचे – हे लुटीचे मोदी मॉडेल आहे. मोदी जी, तुमच्या अपयशाचा भार फक्त गरीबच उचलणार का? तुमच्यामुळे ढासळलेल्या या अर्थव्यवस्थेची किंमत मजूर, शेतकरी, महिला आणि मध्यमवर्गच चुकवणार का?”, असा सवाल देखील राहुल गांधी यांनी केला आहे.