छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविण्यासाठी आरएसएसच्या व्यक्तीला कॉण्ट्रॅक्ट देण्यात आले. त्यातही भ्रष्टाचार झाला. राज्यातील लोकांच्या पैशांची चोरी झाली. पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाल्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. तसेच ज्याच्याकडून चुकीचे काम होते, तोच माफी मागतो, अशी टीकाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली.
सांगली जिल्ह्यातील वांगी येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना, मोहनराव कदमनगर येथे माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचे लोकार्पण सोहळा काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर कडेगाव येथे झालेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार विशाल पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, आयोजक आमदार विश्वजीत कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आज देशात विचारधारेचे युद्ध सुरू असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारधारेवर आम्ही काम करीत आहोत. या विचारधारेच्या युद्धात एका बाजूला काँग्रेस आणि महापुरुष, तर दुसऱ्या बाजूला भाजप आहे. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी लढत आहोत, तर ते हिंसा, द्वेष पसरवीत आहेत. जाती-धर्मामध्ये भांडणे लावत आहेत.’
जातनिहाय जनगणनेबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘भाजप देशातील संविधान संपवीत आहे. शिक्षण, कायदा सगळीकडे त्यांचे लोक घुसविले जात आहेत. मेरिट पाहिले जात नाही. आरएसएसचे असतील तर तुम्ही मेरिटमध्ये आहात, असा प्रकार सध्या सुरू आहे. त्यामुळेच आम्ही जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करीत आहोत. लोकांची संख्या आणि त्यानुसार त्यांना मिळणारी संधी हे समोर आले पाहिजे. जनगणनेला भाजप-आरएसएस विरोध करीत आहेत. मात्र, काँग्रेस जातनिहाय जनगणना करेल,’ असे राहुल गांधी स्पष्ट केले.
संघाच्या माणसाला काम दिल्यामुळे…
राहुल गांधी म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागितल्याचे वाचनात आले. मात्र, मोदी यांनी कुठल्या कारणासाठी माफी मागितली?’ असा सवाल करीत, ‘पुतळा उभारण्याचे कॉण्ट्रॅक्ट आरएसएसच्या व्यक्तीला देण्यात किंवा पुतळा बनविण्यात भ्रष्टाचार झाला, हे कारण असू शकेल,’ असे राहुल गांधी सांगितले.