ब्रम्हांडात काय सुरू आहे हे देखील ते देवांना समजवून सांगतील,, राहुल गांधींचा मोदींना टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. मंगळवारी ते सॅन फ्रॅन्सिस्को येथे पोहोचले असून तेथे त्यांनी हिंदुस्थानी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, मोदी सरकार व भारत जोडो यात्रा या विषयांवर चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

”जग एवढं मोठं आहे की कुणीही आपल्याला सर्व माहित आहे असं मानू शकत नाही. जर कुणी असं मानत असेल तर तो एक आजार आहे. हिंदुस्थानात अशा काही व्यक्ती आहेत, ज्यांना वाटतं की त्यांना सर्व काही माहित आहे. त्या व्यक्ती देवासमोर बसून देवालाही ब्रम्हांडात काय सुरू आहे ते सांगू शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या लोकांमधलेच एक आहेत. जर पंतप्रधांनांना देवासमोर बसवलं गेलं तर ते देवालाच ब्रम्हांडाविषयी ज्ञान देऊ लागतील. त्यामुळे देवही काही वेळासाठी गोंधळून जातील की त्यांनी नक्की काय बनवलं आहे” असा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लगावला आहे.

”हिंदुस्थानात सध्या असंच सुरू आहे. काही लोकं असे आहेत ज्यांना सर्व काही माहित असल्याचे ते दाखवतात. वैज्ञानिकांकडे जातात तेव्हा त्यांना विज्ञानाची माहिती सांगतात. इतिहासकारांकडे जातात तेव्हा त्यांना इतिहासाची माहिती देतात. लष्काराकडे आले की त्यांना युद्धाबद्दल सांगतात. हवाईदलाकडे गेले की त्यांना विमान उडवण्याबद्दल सर्व माहित असतं. पण खरी गोष्ट अशी आहे की त्यांना यातलं काहीच समजत नसतं. कारण जर तुम्हाला कुणाचं काही ऐकुनच घ्यायचं नसेल तर तुम्हाला त्याबद्दल काही माहितच नसतं”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींचा समाचार घेतला.

भारत जोडो यात्रा रोखण्याचे अनेक प्रयत्न झाले

”आमची भारत जोडो यात्रा रोखण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले. पोलीस आणि तपास यंत्रणांचा वापर केला. मात्र त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. तुम्ही सर्वांनी आमची मदत केली. त्यामुळे त्यांनी आमच्याविरोधात केलेले कोणतेही प्लान यशस्वी झाले नाही”, असे राहुल गांधी यांनी सांगितले.