गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा काढल्यावरून लोकसभेत गदारोळ

246

काँग्रेससह अनेक विरोधी खासदारांचा सभात्याग

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारवर हल्लाबोल सुरू केला. अधिवेशनाच्या दुसऱया दिवशी मंगळवारी गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याच्या केंद्राच्या निर्णयावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आक्षेप घेतला. या मुद्यावरून लोकसभेत रणकंदन झाल्यानंतर काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. याच महिन्यात केंद्रातील भाजप प्रणीत आघाडी सरकारने गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा निर्णय घेत त्यांना सीआरपीएफ सुरक्षा दिली आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे काही सर्वसामान्य सुरक्षाप्राप्त नेते नाहीत, असे सांगतानाच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गांधी कुटुंबीयांना ही विशेष सुरक्षाव्यवस्था प्रदान केली होती. 1991 ते 2019 या कालावधीत दोन वेळा एनडीए सरकार सत्तेवर आले, पण त्यांनी गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढली नव्हती, असेही चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले. पाहता पाहता गांधी कुटुंबीयांच्या एसपीजी सुरक्षेचा विषय वाढत गेला. त्यानंतर काँग्रेस खासदारांसह डीएमके, एनसीपी, बीसीजे आणि बसपा या पक्षांच्या खासदारांनी सभात्याग केला.

अधिवेशनाच्या दुसऱयाच दिवशी मोठा गदारोळ

नोव्हेंबरमध्येच केंद्र सरकारने गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यानंतर येत्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष हा मुद्दा उचलून धरणार असा राजकीय तज्ञांचा होरा होताच. त्याप्रमाणे अधिवेशनाच्या दुसऱयाच दिवशी विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. 21 मे 1991 रोजी लिट्टेच्या दहशतवाद्यांकडून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर गांधी कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या