खासदारपद पुन्हा बहाल झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडला भेट देणार

काँग्रेस नेते राहुल गांधी 12 आणि 13 ऑगस्ट रोजी त्यांचा आधीचा मतदारसंघ म्हणजेच वायनाडच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असतील. खासदारपद पुन्हा बहाल झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा असणार आहे. त्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्षं लागलं आहे.

राहुल गांधी यांच्या ‘मोदी आडनाव’ विधानावरून 2019 च्या मानहानीच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर काही दिवसांनी राहुल गांधींचे संसदीय सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले.

लोकसभा सचिवालयाकडून एक अधिसूचना काढण्यात आली की राहुल गांधी यांची लोकसभा सदस्य म्हणून अपात्रता रद्द करण्यात आली आहे.

राज्यसभा सदस्य आणि काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी ट्विटरवर लिहिले की, ’12-13 ऑगस्ट रोजी राहुल गांधीजी त्यांचा मतदारसंघ वायनाडमध्ये असतील! वायनाडच्या जनतेला लोकशाहीचा विजय झाल्याचा आनंद झाला आहे. वायनाडच्या जनतेचा आवाज संसदेत परतला आहे. राहुलजी केवळ खासदार नाहीत तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत!’

संसदीय सदस्यत्व बहाल केल्यानंतर राहुल गांधी जेव्हा संसदेत दाखल झाले तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांचं जबरदस्त स्वागत केलं. राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचं दर्शन घेत प्रार्थना केली.