‘इंडिया’ आघाडीतील काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज येथील विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते थेट वाटेत असलेल्या उचगाव तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये राहणाऱ्या टेम्पोचालक अजित तुकाराम संदे यांच्या कौलारू घरात गेले. तेथे त्यांनी स्वतः वांग्याची भाजी बनवली. तसेच संदे कुटुंबीयांसोबत त्यांनी जेवणही केले.
राहुल गांधी आज सकाळी दहाच्या सुमारास विमानतळावर दाखल झाले. कोल्हापूरकडे जाताना वाटेत असलेल्या उचगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर चौकात त्यांचा ताफा अचानक थांबला. त्यानंतर राहुल गांधी थेट टेम्पोचालक अजित संदे यांच्या कौलारू घरात गेले.
आसपासच्या नागरिकांना राहुल गांधी आल्याची बातमी समजताच त्यांनी संदे यांच्या घराभोवती एकच गर्दी केली. संदे कुटुंबीयांची भेट घेत राहुल गांधी यांनी त्यांच्या घरी वांग्याची भाजी बनविली. तसेच त्यांच्यासोबत जेवण केले. यानंतर संविधानाची प्रत दिल्याचे सांगताना, राहुल गांधी यांचे गरिबाच्या घरी अशा प्रकारे येणे हा एक प्रकारे आत्मसन्मान असल्याचे संदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पाऊण तासानंतर सर्वसामान्यांशी हस्तांदोलन करीत राहुल गांधी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत फोटोसह सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरला नाही.