
सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्को येथे एका कार्यक्रमात म्हणाले की, आज देशात मुस्लिमांसोबत जे काही घडत आहे, ते 1980 च्या दशकात दलितांसोबत घडत होतं. या विरोधात प्रेमानं लढावं लागेल. सॅन फ्रान्सिस्को येथे मोहब्बत की दुकान या कार्यक्रमात बे एरिया मुस्लिम कम्युनिटीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी आरोप केला की, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काही कामाचे परिणाम अल्पसंख्याक, दलित आणि आदिवासी समुदायाच्या लोकांवर होत आहेत.
मुस्लिमांना याचे परिणाम जाणवत आहे. ही गोष्ट त्यांच्यासोबत अधिक प्रमाणात घडत आहे. वास्तवात हे सर्व समुदायांसोबत घडत आहे. ज्याप्रकारे मुस्लिम स्वत:वरील हल्ला अनुभवत आहेत. त्याचप्रमाणे शीख, ख्रिश्चन, दलित आणि आदिवासीसुद्धा अशा प्रकारचा हल्ला अनुभवत आहेत. तुम्ही द्वेशाला द्वेशाने संपवू शकत नाही तर प्रेम आणि स्नेहाने संपवू शकता. जर तु्म्ही 80 च्या दशकात उत्तर प्रदेशात गेला असाल तर तेव्हा अशा घटना दलितांसोबत घडत होत्या, हे आपणास माहित असेल. आपण याला आव्हान दिले पाहिजे. त्याविरोधात लढले पाहिजे. तसेच हा लढा द्वेशाने नव्हे तर प्रेमाने दिला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.
जगभरातील लोकशाही मूल्यांबाबत कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी आणि अनिवासी भारतीयांसोबत संवाद साधण्यासाठी राहुल गांधी अमेरिकेच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथील कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आर्थिक असमानतेबाबत भाष्य केले. तिथे त्यांनी सांगितलं की, काही लोकांना उदरनिर्वाह चालवणे कठीण आहे. तर काही जणांकडे लाखो कोटी रुपये आहेत. यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारदरम्यान करण्यात आलेली जातिनिहाय जनगणना, मनरेगा आणि काँग्रेसकडून प्रस्थावित न्याय योजनेबाबतही भाष्य केले.