आदिवासींच्या ‘वनबंधू’ योजनेचे ५५ हजार कोटी कुठे गेले?

29

सामना ऑनलाईन । गांधीनगर

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेमके आणि अचूक प्रश्न विचारून त्यांची कोंडी करणाऱया काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज मोदींना दहावा प्रश्न विचारला आहे. आदिवासींसाठी असलेल्या ‘वनबंधू’ योजनेचे ५५ हजार कोटी रुपये कोठे गेले, असा सवाल त्यांनी केला आहे. आदिवासींची जमीन बळकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सरकारी शाळा, रुग्णालये आणि आरोग्य सेवा सुरू नसल्याने त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारी योजना आणण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

‘आदिवासी से छिनी जमीन…नही दिया जंगल पर अधिकार…अटके पडे है लाखो जमीन के पट्टे…न चले स्कूल, न मिला अस्पताल…न बेघर को घर न युवा को रोजगार…पलायन ने दिया आदिवासी समाज को तोड…मोदीजी, कहाँ गये वनबंधु योजना के ५५ हजार करोड?’ असा सवाल राहुल यांनी मोदींना केला आहे.

सरकारने आदिवासींची साडेसहा लाख एकर जमीन बळकावली आहे. यूपीए सरकारने ‘मनरेगा’ योजनेसाठी जेवढे पैसे दिले तेवढेच पैसे म्हणजे ३३ हजार कोटी मोदी सरकारने टाटा कंपनीला नॅनो प्रकल्पासाठी दिल्याचे राहुल यांनी सांगितले. गुजरातमध्ये आता काँग्रेसचे वादळ आले आहे, ते कोणीही रोखू शकत नाही, असा दावा करतानाच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय नक्की असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्हाला जीएसटी हवा आहे. गब्बर सिंग टॅक्स नको, असे सांगत त्यांनी जीएसटीवर टीका केली. काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने गब्बर सिंग टॅक्सची मदत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपला गुजरातसाठी काय करायचे आहे?
– छोटा उदयपूर येथील सभेत भाजपला गुजरातसाठी नेमके काय करायचे आहे ते त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांनी अजून जाहीरनामाही प्रसिद्ध केलेला नाही. गुजरातच्या भविष्याबाबत आणि विकासाबाबत पंतप्रधान मोदी काहीही बोलत नाहीत, असा आरोप राहुल यांनी केला.

काँग्रेसला पंतप्रधानपदाचा आदर
– काँग्रेस पक्ष देशाचा पंतप्रधानपदाचा आदर करतो. पक्षातील कोणीही त्या पदाचा अपमान करत नाही. काही भाजप नेते असभ्य भाषा वापरत आहेत. मात्र, ती काँग्रेसची संस्कृती नाही. त्यामुळे पक्षाने मणिशंकर अय्यर यांच्यावर कठोर कारवाई केली, असे राहुल यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या