मुंबईच्या महिला चोरांचा राहुरीत धुमाकूळ, चौघींना अटक

37

राजेंद्र वाडेकर । राहुरी

राहुरीच्या बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन हातसफाई करणाऱ्या मुंबईच्या झोपडपट्टीतील ४ हिंदी भाषीक महिलांना प्रवाशी तसेच बसस्थानक प्रमुखाने रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गुरूवारी सकाळी ११ वाजता बस स्थानकावर ही घटना घडली.

राहुरीत गुरूवारचा आठवडे बाजार असल्याने नेहमीप्रमाणे सकाळीच हातसफाई करणारे राहुरीच्या बस स्थानकावर दाखल झाले होते. नगर येथील दोन महिला प्रवाशी राहुरीच्या बसस्थानकावर पाटोदा पुणे या एस.टी.बस मधून खाली उतरत असताना लहान मुले कडेवर असलेल्या ४ महिलांनी घेरावा घालून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या महिलेने पर्सवर हात साफ करून रोकड लंपास केली. ही घटना लक्षात आल्याने सोन्याचे गंठण बचावले. मात्र प्रवासासाठी ठेवलेले रोकड चोरीस गेली. यावेळी संबधीत ४ महिलांना प्रवाशी तसेच राहुरी बस स्थानक प्रमुख यांनी पकडुन राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी चौकशीचा ससेमिरा सुरू केला असता ताब्यात घेतलेल्या ४ महिलांनी जोराने रडारड सुरू केली. पोलीस हेड कॉन्सटेबल अशोक गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादी वरून लक्ष्मी कुमार व मंजु प्रशांत यांच्या विरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या