लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नववधू गायब, सात जणांवर राहुरीत गुन्हा

लग्न लावून सासरी आलेली नववधू तिसऱयाच दिवशी घरातून गायब झाली. याप्रकरणी नवरदेवाने दिलेल्या फिर्यादीवरून सात लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक भाऊसाहेब खेमनर (रा. तमनर आखाडा, ता. राहुरी) यांचे 5 जुलै 2022 रोजी सोनी शंकर पाटील (रा. आनंदनगर, जुनीवस्ती, सारसी बडनेरा, अमरावती) या तरुणीबरोबर लग्न लावण्यात आले होते. मात्र, लग्नाच्या तिसऱया दिवशी गायब झालेली नववधू अद्यापपर्यंत सासरी न आल्याने अशोक खेमनर यांनी 17 जुलैला राहुरी पोलिसांत फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. लग्नापूर्वी खेमनर यांनी नातेवाईकाच्या मध्यस्तीने मुलीच्या नातेवाईकांना 1 लाख 85 हजार रुपये दिले होते. लग्नानंतर खेमनर नववधूसह तमनर आखाडा येथील घरी आले. मात्र, 8 जुलै 2022 रोजी रात्रीच्या वेळेत सोनी शंकर पाटील ही नववधू नातेवाईकांसह गायब झाली. खेमनर यांनी पत्नी व तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला. मात्र, तो व्यर्थ ठरला.

अखेर 9 जुलैला अशोक खेमनर यांनी मध्यस्थी लोकांकडे चौकशी केली. आम्ही तीन दिवसांत मुलीला तुमच्या घरी आणून सोडू, असे त्यांनी सांगितले. मात्र, अद्यापपर्यंत अशोक खेमनर याची पत्नी सासरी आली नाही. लग्न लावून आपली 1 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर 17 मार्च 2023 रोजी अशोक खेमनर यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून चंदू सीताराम थोरात (रा. ढवळपुरी), भाऊसाहेब वाळुंज (रा. टाकळी ढोकेश्वर), श्याम वाबळे (रा. वासुंदे, ता. पारनेर), अनिता रामचंद्र अग्रवाल (रा. बाळापूर आखाडा, ता. कळनोरी, जि. हिंगोली), सुनील शरद कांबळे (रा. शिवाजीनगर, धाराशिव), राहुल पाटील, सोनी शंकर पाटील (रा. आनंदनगर, जुनी वस्ती सारसी, बडनेरा, अमरावती) या सातजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.