लग्नास नकार दिल्याने तरुणीवर गोळीबार केला, आरोपीचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

782

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे धक्कादायक घटना घडली आहे. विक्रम उर्फ विकी मुसमाडे नावाच्या तरुणाने स्वताच्या डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी त्याने एका तरुणीवर गोळीबार केला होता. या तरुणीच्या आजीने प्रसंगावधान राखत तरुणीला ढकलून दिल्याने ती बालबाल बचावली आहे. तरुणीवर गोळी झाडल्यानंतर विकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विकीने या तरुणीला लग्नाची मागणी घातली होती, जी तरुणीने धुडकावून लावली होती. याचा राग आल्याने विकीने या तरुणीला ठार मारण्याचं ठरवलं होतं.

विकीने गोळी झाडून घेतल्यानंतर त्याला लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. विकी हा देवळाली प्रवरा येथील रहिवासी आहे. सकाळीच तो बंदूक घेूऊन या तरुणीच्या घरासमोर उभा राहिला होता. त्याने तरुणीवर झाडलेली गोळी ही कानाला घासून गेली असून सुदैवाने ती बचावली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार विकीच्या डोक्यातून गोळी आरपार गेली असून घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या घटनेची माहिती मिळताच अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक दिपाली काळे,श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने,राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.फॉरेन्सीक लॅबच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या