बालविवाहातून बालक जन्माला आल्याने राहुरी पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले. गेल्या आठवडाभरात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी घटना राहुरीत उघडकीस आली आहे.
या घटनेतील मुलगी अल्पवयीन असताना तिच्या आई-वडिलांनी मुख्य आरोपीसोबत लग्न लावून दिले. त्यातून आरोपीने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिला. ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याने या घटनेबाबत राहुरी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी पीडितेचे आई-वडील, आरोपीचे आई-वडील तसेच विवाह करणारा नवरा मुलगा यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेतील पाच आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यात आले आहे.
आपली मुलं, मुली कोणासोबत राहतात, खेळतात, फिरतात यावर पालकांनी जागरूकतेने लक्ष ठेवणे आवश्यक असून, मुली कोणाच्या आमिषाला, भूलथापांना बळी पडणार नाहीत, याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे.
– संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक, राहुरी