पश्चिम बंगाल, केरळमध्ये छापेमारी करत NIA ने अल-कायदाचे मॉड्युल उध्वस्त केले, 9 जणांना अटक

राष्ट्रीय तपास संस्था(NIA) ने पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापेमारी करत अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. या छापेमारीदरम्यान तपास यंत्रणेने 9 जणांना अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थाने ही छापेमारी केरळच्या अर्नाकुलम आणि पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबादमध्ये केली होती.

छापेमारीदरम्यान केरळमधून तिघांना तर पश्चिम बंगालमधून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांचे वय 20 वर्षांच्या आसपास असल्याचे कळाले आहे. विशेष म्हणजे हे सगळेजण मजूर काम करणारे आहेत. एका दहशतवादी कटाबाबत माहिती मिळाल्यानंतर या सगळ्यांवर नजर ठेवण्यात येत होती.

या सगळ्यांची माथी भडकावण्यात आली होती असं प्राथमिक तपासामध्ये कळालं आहे. पाकिस्तानातील अल कायदाचे दहशतवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून यांची माथी भडकावण्याचे काम करत होते असे सांगितले जात आहे. या सगळ्यांना दिल्लीसह देशाच्या अन्य भागात दहशतवादी हल्ले करण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं असंही प्राथमिक तपासात कळाल्याचे वृत्त ANI या वृत्त संस्थेने दिले आहे.

अटक केलेल्यांकडून तपास यंत्रणांना जिहादी कागदपत्रे, धारदार शस्त्रे, देश बनावटीचे कट्टे, उपलब्ध साधनांनी बनविलेले चिलखत, घरातल्या घरात स्फोटके बनवण्याचे मार्गदर्शन करणारी कागदपत्रे सापडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या