पूरग्रस्त भागात रायगडमधून 107 टन हिरवा चारा; सांगली, कोल्हापूरकडे वैरणीचे ट्रक रवाना

461

रायगड जिल्ह्यातून सांगली, कोल्हापूर पुरग्रस्त जनावरांना 107 टन चारा पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथे शेतात उतरून श्रमदान करून हिरवा चारा कापण्यासाठी हातभार लावला. पशु संवर्धन, महसूल अधिकारी, जिल्हा परिषद, सरपंच व स्थानिक ग्रामस्थ यांनी श्रमदानातून हिरवा चारा कापून भारे बांधून तो ट्रक द्वारे पूरग्रस्तभागात पाठवून दिला.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घालून पूरस्थिती निर्माण झाली होती. पुरामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. कुटुंब, घरे उद्ध्वस्त झाली, हजारो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे येथील जनतेच्या खाण्या पिण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना जिवंत असणाऱ्या जनावरांनाही आता खायला काय द्यायची ही चिंता येथील शेतकऱ्यांना पडली आहे.

सांगली, कोल्हापूरमधील जनावारांना चारा पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील माळ रानावरील शेतात असलेला हिरवा चारा कापून ट्रकमध्ये भरण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे स्वतः शेतात उतरून चारा कापण्यास मदत करीत होते. पशु, महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी हे सुद्धा शेतात उतरून चारा कापून भारा डोक्यावर घेऊन ट्रकमध्ये भरत होते. तर स्थानिक शेतकऱ्यांनी स्वतः साठी एक भारा ठेवून दोन भारे पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी पाठविले आहेत.

जिल्ह्यातून माणगाव 12 टन, अलिबाग 60 टन, पेण 15 टन, पोलादपूर 10 टन, मुरुड 10 टन असा एकूण 107 टन चारा व पेंडा पुरग्रस्त भागात पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरमधील जनावरांचा खाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास जिल्ह्यातून मदत झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या