गावागावातील तंटेबखेडे पोलीस ठाण्यापर्यंत न नेता गावपातळीवरच ते सोडवण्याचे काम पोलीस पाटील करत असतात. मात्र सध्या या पोलीस पाटलांच्या घरातच वादाला तोंड फुटले आहे. विषयही तसाच गंभीर आहे. रायगडातील पोलीस पाटलांना गेल्या तीन महिन्यांपासून सरकारने मानधनाची फुटकी कवडी दिलेली नाही. याबाबत अनेकदा वरिष्ठ पातळीवर गाऱ्हाणे मांडूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याने घर चालवायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला असून त्यांच्या ‘गृहमंत्री’ रोजच या पोलीस पाटलांना चांगल्याच फैलावर घेत आहेत.
नवी मुंबई आयुक्तालयातील पनवेल व उरण तालुका वगळता रायगड जिल्ह्यातील उर्वरित 13 तालुक्यांमध्ये 954 पोलीस पाटील असून त्यांना दरमहा 15 हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र मेपासून तीन महिने सरकारने पोलीस पाटलांचे मानधन दिलेले नाही. याबाबत आवाज उठवल्यानंतर सरकार निधी नसल्याचे कारण देत आहे. परंतु सरकार एकीकडे विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कोट्यवधींच्या अन्य योजना जाहीर करत असताना गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस पाटलांबाबत उदासीन असल्याने संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान तीन महिन्यांपासून पगाराची पोलीस दमडी मिळाली नसल्याने घर चालवायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला असून गावचे प्रश्न सोडवणाऱ्या पोलीस पाटलांच्या घरातच घरगाडा चालवण्यावरून तू तू मैं मै होऊ लागल्याची चर्चा आहे. याबाबत न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेने रखडवलेले मानधन लवकरच मिळावे यासाठी अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे- पाटील यांना निवेदन दिले आहे. यावेळी पोलीस पाटील संघटना रायगड जिल्हा कार्याध्यक्ष राम सावंत, उपाध्यक्ष श्रीधर गोळे, सचिव महेश शिरसे, नवी मुंबई अध्यक्ष संजय पाटील, खजिनदार संजय बारस्कर आदी उपस्थित होते.
सण साजरे करायचे तरी कसे?
रक्षाबंधन तसेच गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र खिशात पैसे नसल्याने सण साजरे करायचे तरी कसे, असा सवाल पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी विचारला आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व मानधन न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आंदोलन करण्याचा इशारा पोलीस पाटील कुटुंबीयांनी दिला आहे.