रायगड, पालघरमध्येही वादळ घोंगावले; सात बोटी बेपत्ता

113

सामना प्रतिनिधी । पालघर / अलिबाग

ओखीने रायगड आणि पालघर जिह्यातील किनाऱयांना जोरदार तडाखे दिले आहेत. या वादळामुळे पालघरमध्ये ३५ बोटी बेपत्ता झाल्या असून रायगड जिह्यात पाच मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. या वादळी वातावरणामुळे भरदुपारी काळोख झाला होता, तर ठाणे आणि नवी मुंबई शहरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

मच्छीमारांनी आपल्या बोटी किनाऱयावर ठेवाव्यात तसेच मच्छीमारीसाठी समुद्रात खोलवर जाऊ नये, अशा सूचना पालघर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. पालघर तालुक्यातील झाई, वरोर, नरपड, डहाणू, धाकटी डहाणू, पोफरण दांडी, मुरबा, सातपाटी, टेंभी, केळवा, एडवण, किल्लाबंदर, पाचूबंदर, नायगाव तसेच उत्तन येथून १३८४ मच्छीमार बोटी समुद्रात गेल्या होत्या. त्यापैकी १३४९ बोटी किनाऱ्यावर परतल्या असून ३५ बोटींशी संपर्क तुटला आहे. तर वसईतील आठ मच्छीमार बोटी व त्यावरील १२० मच्छिमारांशी संपर्क तुटला असल्याचे ठाण्याच्या मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी सांगितले.

मच्छीमारांना सूचना

वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता मच्छीमारीसाठी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना जवळच्या सुरक्षित बंदराच्या ठिकाणी तत्काळ पोहोचण्याचे संदेश दिले गेले आहेत. पुढील ४८ तासांत वादळी वाऱयाचा वेग ६० ते ७० कि.मी. प्रती तास राहणार असून समुद्र खवळलेला असणार आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात प्रवेश करू नये. तसेच आपत्कालीन परिस्थितीत संबंधित तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02525297474/9158760756 तसेच आयडिया व बी. एस. एन. एल. टोल फ्री नंबर 1077 येथे संपर्क साधावा, असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

बोटी परतल्या

अर्नाळा, वसई येथील सर्व मच्छीमार बोटी किनाऱ्यावर परतल्या आहेत. काही बोटी परतीच्या मार्गावर असून त्यांच्याशी संपर्क काही प्रमाणात तुटला असल्याचे वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले.

लाल बावटा फडकवला

ओखी वादळाचा फटका काही प्रमाणात वसईच्या किनारपट्टी भागाला लागणार असल्याचे समजल्यावर आम्ही मच्छीमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना किनाऱयावर परतण्याचे संदेश पाठवले आहेत. अर्नाळा येथून ३५० ते ४०० बोटी मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या होत्या, त्या बोटी व सर्व मच्छीमार सुखरूप किनाऱयावर परतले आहेत. अर्नाळा येथे धोक्याचा इशारा म्हणून लाल बावटा लावण्यात आलेला असल्याचे अर्नाळा येथील मच्छीमार स्वराज्य समितीचे अध्यक्ष राजू तांडेल यांनी सांगितले.

अलिबाग-मुंबई जलवाहतूक थांबवली

अलिबागमार्गे मुंबईकडे जाणारी बोटसेवा ओखी चक्रीवादळामुळे बंद करण्यात आली आहे. समुद्रकिनारी कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी लाईफगार्ड जवानही तैनात करण्यात आले आहेत. पर्यटकांना समुद्रकिनारी पोहण्यास जाण्यास स्थानिक प्रशासनाने बंदी घातलेली आहे.

सदर बोटी ओखी चक्रीवादळमध्ये भरकटलेल्या असाव्यात असे नातेवाईकांचे म्हणणे असून त्यांच्याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नव्हती. याबाबत कोस्ट गार्ड, जि. आपत्ती व्यवस्थापन, जेओसी, सुरक्षा शाखा, कंट्रोल रूम, नेव्ही यांना संदेश कळवण्यात आले होते त्यानुसार प्रशासनाने या बोटींचा तपास सुरू करून बोटी व त्यावरील २५ जण सुखरूप असल्याचे सांगितले.

चारही बोटी व खलाशी सुखरूप

पश्चिम किनारपट्टीवरून सुरू झालेले ओखी चक्रीवादळ कोकणसह रायगडात पोहोचले आहे. या ओखी चक्रीवादळात जिह्यातील दिघी गाव कोळीवाडा येथील ४ बोटी मच्छीमारीसाठी गेल्या असून वादळात भरकटल्या आहेत. या बोटींवर २५ जण असल्याची माहिती बोटीच्या नातेवाईकांनी दिली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले असून तीन बोटी किनाऱ्यावर येण्यास निघाल्या असून एक बोट थांबलेली आहे. तिच्या मदतीला कोस्टगार्ड गेले असल्याचे जिल्हा प्रशासानाने सांगितले आहे. बोटीतील 25 जण सुखरूप असल्याचे प्रशासनाने सांगितले. रायगड जिह्यातील दिघी येथील बलवली -(ind-mh3 -mm1282), पद्मावती (ind-mh396), संत निर्वाण (ind-mh3 -mm3716), रोहिदास (ind-mh3 -mm3716) या बोटी एकूण २५ खलाशी व कोळी लोक हे ३० नोव्हेंबर रोजी एक वाजता 25 नोटीकल मैल अरबी समुद्रात भारत पेट्रोल सम्राट तेल कंपनी परिसरात मच्छिमारीसाठी गेलेल्या होत्या. ओखीच्या तडाख्यामुळे तब्बल २५० बोटींचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र, त्यातील २४३ बोटी किनाऱ्यावर परत आल्या असून उर्वरित सात बोटी अद्यापही बेपत्ता आहेत.

नवी मुंबईसह पनवेलमध्ये धुवांधार पाऊस

अरबी समुद्रात उसळलेले ओखी चक्रीवादळ आज रायगड समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकल्याने ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल व खारघर भागांत सायंकाळी अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱया चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली. ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे तुरळक पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला होता. त्यातच सकाळपासून आकाशात मळभ दाटून आलेले असतानाच ठाणे, कळवा, डोंबिवली, पनवेल, खारघर, बेलापूर, नेरुळ आणि वाशीमध्ये सायंकाळी पाऊस सुरू झाला. त्यातच पाऊस रिमझिम असूनही अचानक पावसाची एंट्री झाल्याने छत्री, रेनकोट नसलेल्या सर्वसामान्यांची धावपळ झाली. ठाण्यात चौकाचौकात पावसामुळे धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांचीही तारांबळ उडाली होती.

कोल्हापुरात जोरदार पाऊस

अरबी समुद्रावर घोंघावत असलेल्या ओखी चक्रीवादळामुळे आज सायंकाळी कोल्हापुरातही पावसाचा जोरदार शिडकावा झाला. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहरासह जिह्यात काही ठिकाणी पावसाचा जोरदार शिडकावा झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती.

पुण्यात पावसाच्या सरी

ओखी वादळाच्या प्रभावामुळे पुण्यात ढग गोळा झाल्याने अंधारून आले. सायंकाळनंतर शहरासह उपनगरात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. मावळ तालुक्यासह जिह्यात विविध भागांत पावसाने हजेरी लावली होती तर रात्री वारे वाहू लागल्याने हवेतील गारठाही वाढला होता.

आपली प्रतिक्रिया द्या