मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा! युवराज, खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा निर्णय

1048
shivaji-maharaj-1

कोरोनामुळे यंदाचा पाच आणि सहा जूनला किल्ले रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय करवीर संस्थानचे युवराज आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घेतला आहे. कार्यकर्त्यांनी घरात राहूनच विविध उपक्रम राबवावेत मात्र कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहनही संभाजीराजे यांनी केले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवभक्त आणि पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी पाच आणि सहा जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर येऊन शिवरायांचा समोर नतमस्तक होतात. समितीचे मार्गदर्शक आणि खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र या परंपरेत खंड पडणार नाही, यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर होणार असा शब्द छत्रपती संभाजीराजे यांनी दिला होता. सोहळ्याबाबत पदाधिकारी आणि शिवभक्तांशी चर्चा केल्यानंतर कोरोनामुळे शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे

कार्यकर्त्यांना आवाहन
कार्यकर्त्यांनी यावर्षीचा शिवराज्याभिषेक घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा, स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर लावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे, मात्र कोणत्याही परिस्थितीत रायगडावर घेण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या