रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत मोठा निर्णय, छत्रपती संभाजीराजे यांनी केली घोषणा

3110

जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड-19 विषाणूमुळे यंदाचा 5 व 6 जून रोजी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि साधेपणाने साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय करवीर संस्थानचे युवराज व खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शिवभक्त आणि पत्रकारांशी रविवारी सायंकाळी संवाद साधला.

यावर्षीचा शिवराज्याभिषेक घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा. स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे. स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र कोणत्याही परिस्थितीत यावेळी रायगडावर येण्याचा प्रयत्न करु नये, असे विनंतीवजा आवाहनही छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी केले आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी 5 व 6 जून रोजी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो.या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर शिवरायांसमोर नतमस्तक होतात. समितीचे मार्गदर्शक व शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

शिवभक्तांच्या सहकार्याने सन 2008 मध्ये ऐतिहासिक मेघडंबरीत शिवछत्रपतींच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना झाली. या सोहळ्याला एक तप पुर्ण होऊन शिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव बनला आहे. दरवर्षी शिवभक्तांचा गडावर उपस्थितीचा आलेख उंचावत आहे. देशभरातूनच नव्हे तर जगभरातून शिवभक्त रायगडावरील हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यास आणि त्याचा साक्षीदार होण्यासाठी आतुर झालेले असतात.

यंदाही हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरवले होते. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर हा सोहळा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.पण या ऐतिहासिक परंपरेत कोणताही खंड पडणार नाही.यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर होणार असा शब्द छत्रपती संभाजीराजे यांनी गेल्याच आठवड्यात दिला होता. सोहळ्याबाबत समितीचे पदाधिकारी व शिवभक्तांनी चर्चा करून जगभर पसरलेल्या कोरोना महामारीचे संकट पाहता समाज हीत डोळ्यासमोर ठेवून सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे नियोजन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या