रेल कामगार सेनेचा आज इगतपुरीमध्ये वर्धापन दिन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे कामगारांच्या हक्कांसाठी खंबीर भूमिका घेणाऱ्या शिवसेनाप्रणीत रेल कामगार सेनेचा २६ वा वर्धापन दिन मंगळवारी दुपारी ३ वाजता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वर्धापन दिन सोहळा होणार आहे.
मध्य रेल्वेच्या कामगारांच्या हितासाठी आणि हक्कांसाठी रेल कामगार सेना नेहमीच खंबीर भूमिका घेत आहे. त्यामुळे संघटनेची ताकद वाढली असून दरवर्षी संघटनेचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा होतो. यंदा मंगळवार, ९ जून रोजी रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व रेल कामगार सेनेच्या मुंबई डिव्हीजनचे अध्यक्ष चंद्रकांत विनरकर आणि सचिव तुकाराम कोरडे यांच्या पुढाकाराने इगतपुरी येथील रनिंग रूमजवळील पीडब्ल्यूआय कार्यालय येथे संघटनेचा २६ वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहतील. या सोहळ्याला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रेल्वे कामगारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रेल कामगार सेनेचे सरचिटणीस, शिवसेना उपनेते दिवाकर (बाबी) देव यांनी केले आहे.