डोंबिवलीजवळ रेल रोको, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

45

सामना ऑनलाईन । डोंबिवली

डोंबिवली आणि कोपर स्थानकादरम्यान रुळाजवळ असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू होताच सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी रुळांवर येऊन रेल रोको आंदोलन केले. रहिवाशांनी चार रुळांवर गर्दी केली आणि आंदोलन सुरू केले. आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

रुळाजवळ झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे सिग्नल स्पष्ट दिसत नाही अशी तक्रार अनेक मोटरमनकडून आल्यामुळे बांधकाम हटवण्याची कारवाई सुरू झाली. मात्र झोपडपट्टीतील रहिवाशांनी बांधकाम हटवण्याच्या कारवाईला विरोध केला. रहिवासी रेल्वेच्या चारही रुळांवर रेल रोको आंदोलन करू लागल्यामुळे वाहतूक पुरती ठप्प झाली. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चेचा पर्याय दिला. झोपडपट्टीला लागूनच असलेली पर्यायी जागा दिल्यास झोपड्या रिकाम्या करण्याची तयारी आंदोलक रहिवाशांनी दाखवली आणि १५ मिनिटांतच रेल रोको आंदोलन थांबले. मात्र जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाल्यामुळे आंदोलन संपले तरी वाहतूक सुरळीत करता-करता मध्य रेल्वेच्या प्रशासनाची दमछाक झाली.

आपली प्रतिक्रिया द्या