रेल्वे अपघात आणि रुळांची निगराणी

2522

>>यशवंत जोगदेव

मुंबईतील उपनगरी रेल्वेची वाहतूक अनेक पट वाढली आहे. अवघ्या दोन मार्गांवरून हजारपेक्षा जास्त उपनगरीय गाड्या, मेल एक्स्प्रेस गाड्या आणि चार ते पाच हजार टन वजन असलेल्या मालगाड्या धावत असतात. साहजिकच भारी मालवाहतूक आणि गाड्यांचा वाढलेला वेग यांनी लोहमार्गावर प्रचंड दबाव येत असल्यामुळे रूळ तुटण्याचा धोका वाढतो. त्यातूनच रूळ तुटण्याच्या, रूळाला तडे जाण्याच्या घटना अलीकडे वारंवार घडू लागल्या आहेत.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवेला अपघात घडण्याची परंपरा या वर्षीही कायम राहिली. रविवारी भल्या पहाटे कुर्ला कारशेडमधून सुटलेली अंबरनाथ लोकल विठ्ठलवाडीच्या जवळपास घसरली. या विचित्र अपघातात मोटरमनच्या डब्यासोबत सात डबे पुढे गेले व मागील पाच डबे घसरले. स्वाभाविकच घसरलेल्या गाडीचे डबे दुसर्‍या मार्गावर पडण्याचा धोका लक्षात घेऊन दोन्ही मार्गांवरची वाहतूक दिवसभर बंदच राहिली. पुण्याहून मुंबईकडे येणार्‍या मध्य रेल्वेचे भूषण असलेल्या ‘डेक्कन क्वीन’सारख्या गाड्या यादिवशी रद्द झाल्या.

नेहमीप्रमाणे रेल्वेचा अपघात घडल्यानंतर उच्च दर्जाचे रेल्वे अधिकारी, पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार ही मंडळी अपघातस्थळी पोहोचली. सर्वसामान्यांचे हाल व रिक्षावाल्यांचा प्रचंड फायदा झाला. संध्याकाळनंतर रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

मुंबईतील उपनगरीय रेल्वेची वाहतूक अनेक पट वाढली आहे. अवघ्या दोन मार्गांवरून हजारपेक्षा जास्त उपनगरीय गाड्या, मेल एक्स्प्रेस गाड्या आणि चार ते पाच हजार टन वजन असलेल्या मालगाड्या धावत असतात. मात्र कल्याण ते कर्जत आणि कसारा या भागात रेल्वे वाहतुकीसाठी गेली १५० वर्षे फक्त दोनच मार्ग आहेत. प्रवासी संघटना आणि नागरिकांनी वारंवार या मार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी केली आहे. ते अद्याप न झाल्यामुळे प्रचंड वाहतूक वाढलेल्या गाड्यांची संख्या १० पट झाली. साहजिकच भारी मालवाहतूक आणि गाड्यांचा वाढलेला वेग यांनी लोहमार्गावर प्रचंड दबाव येत असल्यामुळे रूळ तुटण्याचा धोका वाढतो त्यातूनच रूळ तुटण्याच्या, रुळाला तडे जाण्याच्या घटना अलीकडे वारंवार घडू लागल्या आहेत. शिवाय गाड्या रूळावरून घसरणे, त्यामुळे वाहतूक विस्कळीत होणे अशी ही रेल्वेच्या बिघडलेल्या वाहतुकीची ‘सीरियल’ सतत सुरू आहे.

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय गाड्यांचा अपघात झाला की मुंबईतील जीवन विस्कळीत होते. मुंबईतील ८० टक्के प्रवासी रेल्वेवर अवलंबून आहेत. रेल्वे ही त्यांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीला हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर रक्तप्रवाह खंडित झाल्यामुळे त्याचा जीव जसा कासावीस होतो तोच अनुभव मुंबईतील लोकांना उपनगरी रेल्वे विस्कळीत झाल्यावर येतो. रेल्वे प्रशासन व त्यांचे कर्मचारी दिवसरात्र गाड्या चालवण्यासाठी मेहनत करतात. मात्र अपघात झाले असता त्याचे खापर आपल्या विभागावर पडू नये म्हणून रेल्वेतील सर्वच संबंधित विभाग परस्परांवर जबाबदारी ढकलतात. इंजिनीयरिंग विभाग, गाड्यांची वाहतूक करणारे ऑपरेटिंग डिपार्टमेंट, ज्यामध्ये स्टेशन मास्तर, गार्ड आणि ड्रायव्हर येतात तसेच गाड्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी असणारी कुर्ला, कळवा, सानपाडा कारशेड, लोहमार्गावरील सिग्नल आणि सांधेबदल करणार्‍या यंत्रणेचा सिग्नल विभाग या प्रत्येक विभागाचे अधिकारी या अपघातांचा दोष आपल्या खात्यावर येऊ नये म्हणून अपघातस्थळी धाव घेतात आणि वेगवेगळी शक्यता वर्तवतात. त्याद्वारे आपल्या विभागाचा कर्मचारी त्यात फसणार नाही याची ते पूर्ण काळजी घेतात.

प्रत्येक अपघातानंतर होणारी ही ‘सर्कस’, नेहमीच चालू असते. परंतु शेवटी रेल्वे अपघात का घडला याचा शोध घेण्याचे काम रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडेच असते. त्यांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय अपघातांची कारणे कळत नाहीत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या वर्षी रेल्वेने एक अजब खुलासा केला आहे. माहिती अधिकाराखाली वारंवार अपघात का होतात व रूळ का तुटतात, असा प्रश्‍न रेल्वे प्रवासी संघटनेचे अधिकारी समीर झवेरी यांनी रेल्वेच्या अधिकार्‍याला विचारला असता मध्य रेल्वेने रेल्वे रूळ ओलांडणार्‍या प्रवाशांच्या वजनाने खडी दबली जाते व त्यामुळे रूळ तुटतात असे कारण दिले आहे. त्याचप्रमाणे पश्‍चिम रेल्वेने त्याचा मार्ग समुद्राच्या बाजूने जात असल्याने खार्‍या हवेने रूळ कमजोर होऊन तुटतात असे उत्तर दिले आहे. रेल्वे अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्तींना, कर्मचारी संघटनांना, माझ्यासारख्या अभ्यासकांना तसेच रेल्वेतील अधिकारी व युनियनच्या लोकांनाही ही मते पटणार नाहीत.

मात्र अत्यंत गहन संशोधन करून ही मते खरीच असतील व रूळ वारंवार तुटणार असतील तर प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळण्याऐवजी भविष्यात रेल्वेने लोखंडी चाकांना कुठला पर्याय देता येतो का याचे उत्तर शोधले पाहिजे. अर्थात तसे करायचे झाल्यास रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प करावी लागेल आणि घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई एकदम थांबेल. ते कुणालाच परवडणारे नाही. तेव्हा असे व्हायला नको असेल तर आहे तेच रूळ उत्तम प्रकारे कसे वापरता येतील, त्यांची योग्य निगराणी कशी ठेवता येईल, याकडे लक्ष देणे रेल्वे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या