मुंबईची लोकल गोंधळाच्या रुळांवर!

3451

मेल, एक्प्रेस, पॅसेंजर ट्रेनसह मुंबईतील लोकल सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील, असे पूर्व रेल्वे विभागाचे पत्र सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच गोंधळ उडाला. वृत्तवाहिन्यांनीही याची ‘ब्रेपिंग न्यूज’ केली. अखेर रेल्वे मंत्रालयाचे पत्र खोटे असल्याचा खुलासा सायंकाळी केला खरा, पण तोपर्यंत मुंबईची लोकल गोंधळाच्या रुळांवर वेगात धावत होती. लोकल सुरू कधी होणार याचे उत्तर देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत.

लॉकडाऊन काळात 23 मार्चपासून देशभरातील मालवाहूतक वगळता सर्व रेल्वे सेवा बंदच आहे. अपवाद फक्त विशेष मेल, एक्प्रेस आणि मुंबईतील ‘अत्यावश्य सेवा’ लोकल ट्रेनचा. रेल्वे मंत्रालयाने टप्प्याटप्प्याने ही ‘बंद’ची तारीख वाढवली होती. अखेरचे आदेश 25 जूनला जारी करण्यात आले. त्यानुसार लोकल ट्रेन आणि मेल-एक्स्पेस गाडय़ा 12 ऑगस्टपर्यंत बंद राहतील असे आदेशात म्हटले होते.

लोकल ट्रेन ही मुंबईची लाइफलाइन समजली जाते. ती सुरू कधी होणार हाच मुंबईकरांचा सवाल आहे. सोमवारी पूर्व रेल्वेच्या चीफ पॅसेंजर ट्रान्स्पोर्टेशन मॅनेजरच्या नावे जारी झालेले एक पत्र सोशल मीडियावर आले आणि गोंधळाला सुरुवात झाली. लोकल ट्रेन 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील असे त्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे साहजिकच वृत्तवाहिन्यांवर बातम्या झळकल्या. मध्य रेल्वेनेही पूर्वेच्या पत्राला पुष्टी देणारे मेसेज फिरवले. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला.

गोंधळात गोंधळ

  • मुंबईतील लोकलसह सर्व मेल, एक्प्रेस कधीपर्यंत बंद राहणार याची तारीख रेल्वे मंत्रालयाला 12 ऑगस्टपर्यंत जाहीर करावीच लागणार.
  • तशात 30 सप्टेंबरपर्यंत लोकल बंद राहणार हे पूर्व रेल्वेचे पत्र व्हायरल झाले.
  • मध्य रेल्वेनेही 11 मे 2020 चे जुने आदेश पत्र पुन्हा ट्विट करून पूर्वेच्या पत्राला एका परीने पुष्टीच दिली.
  • रेल्वे मंत्रालय म्हणते पत्र खोटे, पण पुढील आदेशापर्यंत लोकल-एक्प्रेस सेवा बंदच राहणार.

आपली प्रतिक्रिया द्या