रेल्वे डब्यात आयसीयूची सुविधा देणे अशक्य! रेल्वे प्रशासनाची हायकोर्टात माहिती

253

कोविड रुग्णांना उपचारासाठी जागा अपुरी पडू नये म्हणून रेल्वे डब्यात क्वारंटाईन युनिट उभारता येईल. परंतु रेल्वेत आयसीयूची सुविधा देणे सध्या तरी शक्य नाही. तशी सुविधा द्यायची झाल्यास डब्यात मोठय़ा प्रमाणात योग्य ते बदल करावे लागतील अशी माहिती सेंट्रल रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

कोविडशी दोन हात करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेली वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे बंद केलेली रुग्णालये आणि नर्सिंग होम पुन्हा सुरू करण्यात यावेत, तसेच रुग्णांच्या उपचारासाठी जागा अपुरी पडू नये म्हणून रेल्वेच्या डब्यात आयसीयू युनिटसह आयसोलेशन कक्ष तयार करण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नरेश कपूर यांनी ऍड. प्रेरक चौधरी आणि ऍड. जिगर कामदार यांच्या वतीने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायामूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायामूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्स मार्फत सुनावणी घेण्यात आली. मध्य रेल्वेचे मुख्य रोलिंग स्टॉक अभियंता रुपेश कोहली यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, केवळ कोविडची अल्प लक्षणे असणाऱया संशयितांना किंवा आयसोलेशन करण्यापुरतीच रेल्के डब्यात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नॉन एसी कोचमध्ये आयसीयूची सुविधा देणे सद्या तरी शक्य नाही. या डब्याचा कापर काही कालावधीनंतर पुन्हा प्रवाशी वाहतुकीसाठी केला जाणार आहे.

892 कोचेसचे आयसोलेशनमध्ये रूपांतर
कोविड रुग्णांना जागा अपुरी पडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर काम हाती घेतले असून 892 डब्याचे कोविड आयसोलेशन सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यापैकी मध्य रेल्वेने 482 डबे तर पश्चिम रेल्वेने 410 डब्यात तात्पुरते बदल केले आहेत. हायकोर्टाने हे प्रतिज्ञापत्र स्वीकारत याचिका निकाली काढली.

आपली प्रतिक्रिया द्या