कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे अपघात टळला, रूळांना जोडणाऱ्या ३०८ पेंडोल क्लिप्स गायब

44

सामना ऑनलाईन। लखनौ

लखनौ येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. रविवारी सकाळी रेल्वेमार्गाचे निरिक्षण करताना कर्मचाऱ्यांना डालीगंज ते बादशाह नगर स्थानका दरम्यान रूळांना जोडणाऱ्या ३०८ पेंडोल क्लिप्स गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ताबडतोब लखनौकडे येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

रविवारी सकाळी साडेचारच्या सुमारास काही गँगमन रेल्वेमार्गाचे निरिक्षण करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी डालीगंज ते बादशाह नगर स्थानकादरम्यान रूळ पटरीला जोडून ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेंडोल क्लिप्स रुळावर विखुरलेल्या दिसल्या. एवढ्या क्लिप्स रूळावर बघून गँगमन्सला संशय आला व त्यांनी मार्गावरील सर्व रुळांची पाहणी करण्यास सुरुवात केली. यावेळी अनेक रुळांना पेंडोल क्लिप्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब संबंधित रेल्वे विभागाला याबद्दल कळवले. रुळांना पेंडोल क्लिप्स नसल्याचे समजताच पूर्वोत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रूळांच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले.

दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लखनौकडे येणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या