रेल्वेगाड्यांच्या भोंग्यांनी कंटाळले, खारमधल्या रहिवाशांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार

1292
railway-zero-accident

मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्टेशनच्या जवळ घर असावं. मात्र खारमधल्या 150 कुटुंबांना स्टेशनजवळ राहात असल्याचा वैताग आला आहे. या कुटुंबाना फक्त खार स्टेशनच नाही तर बांद्रा स्टेशनही जवळ आहे. एक सोडून दोन स्थानके जवळ असलेल्या जयभारत सोसायटीतील या कुटुंबांनी थेट रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना रेल्वेगाड्यांच्या सतत वाजणाऱ्या भोंग्यांमुळे त्रास होतो.

लॉकडाऊन घोषित व्हायच्या आधी रेल्वेगाड्यांच्या भोंग्यांचा फार त्रास नव्हता. मात्र लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर  आणि रेल्वेगाड्यांची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आल्यापासून या भोंग्यांचा जाम त्रास व्हायला लागला आहे असं या कुटुंबांचे म्हणणे आहे. दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. तेव्हापासून भोंगे वाजवण्याचं प्रमाण जास्तच वाढल्याचं या कुटुंबांनी म्हटलं आहे. या भोंग्यांमुळे आमच्या दैनंदीन जीवनावरही परिणाम व्हायला लागल्याचं या सोसायटीतील रहिवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या विचित्र तक्रारीबाबत बोलताना म्हटले की रेल्वेगाडीचे भोंगे हे लोकांचा अपघात होऊ नये यासाठी असतात. हे भोंगे उगाच वाजवून कोणाला त्रास देण्याचा मोटरमनचा कोणताही हेतू नसतो.

या सोसायटीतील रहिवाशांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना टॅग करत ट्विट केली आहेत. यामध्ये त्यांनी भोंगा वाजवत जाणाऱ्या गाड्यांचे व्हिडीओही दाखवले आहेत. निखील देसाई (58- वर्षे) नावाच्या व्यक्तीने म्हटलंय की आजूबाजूने कोणतीही रेल्वेगाडी गेली की मोटरमन 15 ते 20 सेकंद हॉर्न वाजवत राहतात. अतुल शहा (वय-60वर्षे) नावाच्या डॉक्टरने म्हटलंय की हा आवाज इतका मोठा असतो की रुग्ण फोनवर काय बोलतोय हे ऐकायलाच येत नाही. या रहिवाशांनी केलेल्या तक्रारीवर पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवरून त्यांना तक्रारीची योग्य दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या