उल्हासनगरातील दृष्टिहीन प्रांजलला मिळणार रेल्वेतच नोकरी

49

सुरेश प्रभू यांचे रेल्वे प्रशासनाला आदेश
उल्हासनगर- यूपीएससी परीक्षेत टॉपर आलेल्या उल्हासनगरातील प्रांजल पाटील या दृष्टिहीन विद्यार्थिनीला रेल्वेने आश्‍वासन देऊनही नोकरी नाकारली होती. याबाबत प्रांजलने ट्विटर व फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे कैफियत मांडली होती. प्रांजलच्या या हाकेची दखल घेत सुरेश प्रभूंनी रेल्वेने दिलेल्या आश्‍वासनानुसार तिला नोकरी देण्याचे आदेश दिले आहेत.

दृष्टिहीन असून देखील यूपीएससीत घवघवीत यश संपादन करणार्‍या प्रांजलचे संपूर्ण देशाने कौतुक केले. तिने २०१६ मध्ये यूपीएससीच्या परीक्षेत ७७३ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. प्रांजल सध्या दिल्लीत पीएचडी करत आहे. प्रथम नोकरीचे आश्‍वासन दिल्यावर आणि इतर टॉपरला ट्रेनिंग देण्यास सुरवात केल्यावर, ऐनवेळी १०० टक्के दृष्टिहीन असल्याचे निमित्त पुढे करून रेल्वेने प्रांजलला ट्रेनिंगसोबतच नोकरीही नाकारली होती.

रेल्वेच्या या नकारात्मक निर्णयामुळे हताश झालेल्या प्रांजलने आपली नोकरी पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र त्यात तिला यश आले नाही. शेवटी फेसबुक व ट्विटर अशा सोशल मीडियाचा आधार घेऊन प्रांजलने आपली व्यथा मांडली तिने म्हटले आहे की, मी अथक प्रयत्न करून शिक्षण घेतले आहे व त्यानंतर यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले आहे. मात्र त्यानंतरदेखील मला अशा प्रकारची वागणूक मिळत आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे ट्वीटर व फेसबुकवर कैफियत मांडली होती. संपूर्ण देशात हा संदेश व्हायरल झाल्यावर अखेर तिला न्याय मिळाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रांजलच्या हाकेला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी प्रांजलला नोकरी देण्याचे आदेश रेल्वेला दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या