कसाऱ्याजवळ मालगाडी घसरली, मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली

56

सामना प्रतिनिधी । इगतपुरी

मुंबईहून भुसावळकडे जाणारी मालगाडी कसारा स्थानकाजवळ रेल्वे रुळावरून घसरल्याने मुंबईहून नाशिककडे येणारी प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

आज (शनिवार) सायंकाळी ७.१५ च्या सुमारास मुंबईहून भुसावळला जाणाऱ्या मालगाडीचे डबे कसारा स्थानक सोडल्यानंतर काही अंतरावर रुळावरून घसरले. या अपघातामुळे मुंबईहून नाशिकडे येणारी प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नाशिककडे येणारी पनवेल गोरखपूर एक्सप्रेस, मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस, मुंबई मनमाड राज्यराणी एक्सप्रेस खर्डी या गाड्या आटगांव स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. मालगाडीचे डबे हटवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून चार ते पाच तासानंतर वाहतूक सुरळीत होणार असल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. मालगाडी घसरल्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी उंबरमाळी स्टेशन दरम्यान लोकलमधून ट्रॅकवर उतरून पायी जाण्याचा मार्ग अवलंबला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या