रेल्वे प्रवास महागणार

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

प्रवाशांचे आदरतिथ्य करणे हे रेल्वेचे काम नाही, तर नवीन गाड्या उपलब्ध करून आणि ते चालविणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सुविधांसाठी पैसे द्यावेच लागतील, असे स्पष्ट करीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवीन वर्षात रेल्वेची तिकीट दरवाढ होणार याचे संकेत दिले आहेत.

यावर्षीपासून रेल्वेचे स्वतंत्र बजेट मांडले जाणार नाही. केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वेचे बजेट समाविष्ट केले जाणार आहे. दोन महिन्यांनंतर केंद्रीय अर्थसंकल्प अरुण जेटली सादर करतील. तत्पूर्वीच त्यांनी रेल्वेचा प्रवास महागणार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले आहे. रेल्वेचे प्रमुख काम हे नवीन गाड्या सोडणे आणि कामगिरी सुधारणे हे आहे. आदरातिथ्य करणे हे रेल्वेचे मुख्य काम नाही, असे जेटली म्हणाले.

यापूर्वी रेल्वे अर्थसंकल्प म्हणजे फक्त लोकप्रिय घोषणा करायच्या, असे समीकरण बनले होते. रेल्वे अर्थसंकल्पात नवीन गाड्यांची घोषणा किती होते याचीच लोकांना उत्सुकता असायची. रेल्वेची कामगिरी सुधारण्याऐवजी लोकप्रिय घोषणांवर भर दिला जायचा; परंतु आता ही प्रथा यापुढे राहणार नाही.