मुंबईसह राज्यभरात शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग केली. पुढील चार दिवसदेखील मुंबई शहर आणि उपनगरासह राज्यभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून शनिवारी देण्यात आला. रविवारी मुंबईसह ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ‘ऑरेंज अलर्ट’ तर पालघर, पुणे आणि साताऱ्याला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव या जिह्यांसह मराठवाडय़ातील काही काही जिल्हे आणि संपूर्ण विदर्भामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. कोल्हापुरातदेखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईत शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. सकाळी 8ः30 ते सायंकाळी 5ः30 या वेळेत पुलाबा येथे 43.2 मिमी, सांताक्रुझ 64.9 मिमी, माटुंगा 58.5 मिमी, शीव 80.5 मिमी, विक्रोळी 65 मिमी, राम मंदिर 65 मिमी तर दहिसरला 38.5 मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळनंतर मात्र पावसाचा जोर ओसरला. तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पावसाच्या सरींचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी गेट वे ऑफ इंडियासह मरिन ड्राईव्ह, गिरगाव, अक्सा, जुहू अशा विविध चौपाटय़ांवर गर्दी केली होती. काहींनी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील धबधब्यांवर पुटुंबीय आणि मित्रमंडळीसह हजेरी लावली.
दरम्यान, समुद्राला उधाण येणार असून साडेचार मीटरपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी येणे टाळावे, असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वाऱ्यांची स्थिती चक्राकार स्थिती आहे तसेच पश्चिम बंगालजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात सौराष्ट्रलगत वाऱ्यांची चक्राकार स्थिती कायम आहे आणि दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.