पाऊस Food चटकदार…

265

 शेफ नीलेश लिमये, [email protected]

पाऊस म्हणजे भिजणं…

पाऊस म्हणजे गाणं…

पाऊस म्हणजे उत्फुल्ल…

उत्कट प्रेम… आणि पाऊस

म्हणजे मस्त चटकदार खाणं…

मुसळधार कोसळणारा पाऊस… आणि… कितीतरी गोष्टी या पावसाबरोबर जोडल्या जातात. मस्त भिजणारी प्रेमजोडी… एका छत्रीतून जाणारी ती दोघं… साचलेलं पाणी… त्यात सोडलेल्या कागदाच्या होडय़ा… आणि… मस्त भाजलेलं मक्याचं कणीस… गरमागरम कांदा भजी… तिखटसर मसाला चहा आणि अक्षरशः बरंच काही… खाण्यासाठी जन्म आपुला ! आपण कोणत्याही ऋतूत त्या हवेला साजेसे पदार्थ शोधून काढतो… त्यांचा आस्वाद घेतो.

पावसाळा म्हटलं की आमची जय्यत तयारी सुरू होते ती खास दुपारच्या चहाला, किंवा ज्याला पंचतारांकित भाषेत ‘हाय टी’ असं म्हणतात ते मेनू घडवण्याची… म्हणजे समोर छान लॉन पसरलेलं आहे… रिमझीम पाऊस पडतोय… टेबलावर वाफाळलेल्या मस्त चहाची किटली ठेवलीय… त्यात थोडासा गवती चहा किंवा आलं ताजं किसलेलं घालून छान कडक बनवलेला चहा आहे… त्याचबरोबर गरमागरम कुरकुरीत भजी, समोसे… वाटतंय ना तुम्हाला की आपल्या घरीही लगेच या तयारीला लागावं? अहो, पावसाळ्याची हीच गंमत आहे… म्हणजे जसं आपल्याला हिवाळय़ात हुरडा खावासा वाटतो, तसंच पावसाळय़ात छान गरमागरम रस्सा किंवा अगदी वाफवलेली बिर्याणी, मग ती व्हेज असो की नॉनव्हेज… शाकाहारी असो की मांसाहारी… आपल्याला ती खावीशी वाटते. आता तसंही घरात कुणी स्वयंपाक करत नाही, पण जिभेचे चोचले मात्र आपण ऋतूनुसार बदलतच असतो. यात एक आवर्जून सांगावंसं वाटतं की, नो डाऊट… कधीकधी आपल्याला बर्गरही खावासा वाटतो… आणि पावसाळय़ात जर का गरमागरम तव्यावर परतून आणलेलं ते बर्गर पॅटीस… त्यावर थोडे मस्त गरमागरम पोटॅटो चिप्स… आणि नुसत्या दोन साध्या पावांच्या मध्ये लादलेले कोलस्लॉ… हे एकत्रितपणे खायला जी मजा येते ती मजा तुम्हाला कितीही भूक लागली असली तरीपण ऐन उन्हाळय़ात मात्र असे चमचमीत पदार्थ खावेसे वाटत नाहीत. चटपटीत, चमचमीत, खुसखुशीत पदार्थांची रेलचेल ही या मान्सूनची खासियत.

आमचं एक रेस्टॉरंट एका शेताच्या मध्यभागी आम्ही वसवलेलं होतं. तिन्ही बाजूंनी हिरवीगार शेतं… त्याला लगडलेले टोमॅटो, मिरच्या आणि बाकी इतर मोसमात पूर्णपणे ओसाड दिसलेली जमीन, मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यावर (म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये) गवतासारखी दिसणारी कोथिंबीर, तिचा मस्त पसरलेला सुवास… नक्कीच कुठल्याही शेफला कोथिंबिरीची एक नवी चटणी बनवण्याची प्रेरणा देण्यासारखी होऊ शकते. शेतकरी राजा, शेफ आणि आपली खाद्यसंस्कृती या तिन्हीचा एक ट्रक आहे, जो आपल्या सगळय़ांना एकत्रितपणे या पूर्ण वर्तुळात फिक्स केलेला आहे. आपण सगळेजण पावसाळय़ावर जेवढं अवलंबून असतो, एक शेफ म्हणून किंवा एक खवय्या म्हणून… याच पावसाळय़ाची वाट बघत असतो. मग धबधब्याखाली उभे राहून कोळशावर भाजलेली कणसं, मीठ लावून छान रोस्ट केलेली रताळी, त्याच चुलीच्या आचेवर भाजलेले बटाटे, कांदे, लसूण, टोमॅटो याची छान एक भाजी करायची… आणि गरमगरम भाकरीबरोबर ती चाखायची. खरोखरच खूप प्रकारचे मसालेही लागत नाहीत आणि उगाचच आटापिटाही पडत नाही. स्वच्छ, निथळ, चविष्ट अशी ही भाजी, त्यावर भुरभुरलेली थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटोचा तो रसाळपणा… आणि लसणाचा तो खमंगपणा… एवढी साधी भाजी आपण एखाद्या पिकनिक स्पॉटला जाऊन बनवू शकतो. म्हणायला फक्त बटाटय़ाचा रस्सा, पण पावसातल्या भाजलेल्या भाज्यांची जी एक खास प्रकारची चव येते ती इतर कुठल्याही दिवसांत येऊ शकत नाही.

थोडक्यात काय, पिकनिक स्पॉट जेव्हा आपण शोधतो, तेव्हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो आपल्या खाण्याचा… तो प्रश्न सॉल्व्ह होणार असेल तर ओलंचिंब भिजायला आणि चमचमीत पदार्थ चाखायला कोणालाही लाज वाटणार नाही. याक्षणी मी हे तुम्हाला सांगतोय, कारण मी आत्ता माझ्या घरच्या वाटेवर आहे… आभाळ भरून आलं आहे… हवेत एक छान ओलावा आहे… आणि मला हुक्की आली आहे ती घरी जाऊन कांदाभजी, मिरची वडा आणि कडक फिल्टर कॉफी यावर ताव मारायची… मेघनाला कॉफी बनवून ठेवायला सांगणार आहे… आणि मी या भज्यांच्या तयारीला लागणार आहे. जर का असाच मोसम राहिला तर सकाळच्या न्याहरीचंही नियोजन करून ठेवणं भाग पडेल. त्यामध्ये माझ्या आवडीचं आणि बऱयाच दिवसांत न खाल्लेलं गरमागरम चीज चिली टोस्ट, एक कडक मसाला आमलेट, लोणी लावलेले मस्त टोस्टचे स्लायसेस, तुपात बनवलेलं आमलेट (त्याची एक वेगळीच चव असते) आणि गवती चहा… याची तयारी मला नक्कीच करून ठेवायचीय. कारण पावसाळय़ाची ही मजा आपण नाही घेतली तर मुंबईत राहून काय केलंत? मात्र वरुणराजाला प्रार्थना आहे की, संपूर्ण देशात या मोसमात असाच बरसत राहा.

चहाचा मसाला

साहित्य..४० वेलची (हिरवी), २५ काळीमिरी, १५ ते १८ लवंग, ५ काडय़ा दालचिनी (२ इंच प्रत्येकी), १ चमचा सुंठ पावडर, ३ ते ४ जायफळ किसलेले.

कृती..प्रथम वेलची सोलून घ्यायची आणि दालचिनी हाताने तुकडे करून घ्यावी. सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घ्याव्या. चार कप चहासाठी दीड ते दोन चमचे मसाला वापरावा. चहा पावडरबरोबरच हा मसाला घालावा. चहा उकळल्यावर गॅस बंद करून मिनिटभर झाकण ठेवावे. यामुळे मसाल्याचा स्वाद चहामध्ये चांगला मुरतो.

काळीमिरी, वेलची, दालचिनी आणि सुंठ यांची फ्रेश पावडर वापरूनही मसाला बनवू शकतो. जर दालचिनीचा स्वाद आवडत असेल तर ती थोडी जास्त घालावी. चहाच्या मसाल्यात वाळवलेली चहाची पाती, बडीशेप आणि थोडय़ाशाच प्रमाणात चक्रीफूल घालू शकतो. वेलची न सोलता वापरली तरी चालेल.

कुरकुरीत कांदा भजी

साहित्य..एक मोठा लाल कांदा, तिखट, मीठ चवीनुसार, बेसन (अंदाजे), तेल तळण्यासाठी, किंचित हळद, चिमुटभर ओवा आणि मूठभर कोथींबीर.

कृती ..सर्वप्रथम कांदा बारीक उभा कापून घ्यायचा. त्याच्या पाकळ्या नीट वेगळ्या करुन त्यावर मीठ, तिखट, ओवा, हळद घालून मिश्रण नीट एकत्र करून १० मिनिटे बाजूला ठेवावे. १० मिनिटानंतर तळण्यासाठी तेल तापायला ठेवायचे. तोपर्यंत कांद्याला पाणी सुटेल. त्यात थलथलीत भिजेल इतके पीठ घालावे. पाणी अजिबात घालू नये. मग कोथींबीर घालून त्यावर १ चमचाभर गरम तेल घालावे. चमच्याने नीट मिसळून गरम तेलात भजी करुन दोन्ही बाजूने कुरकुरीत तळाव्यात.

या भजीला ‘खेकडा भजी’ असेही म्हणतात. दुसरं म्हणजे पीठ भिजवताना पाणी अजिबात वापरु नये. शक्यतो लाल कांदा वापरावा. निदान पांढरा कांदा वापरु नये. ही भजी कुरकुरीत होण्यासाठी सोडा घालायची गरज नाही. सोडय़ाने भजी तेलकट होतात.

ब्रेड मिक्स आम्लेट

साहित्य..दोन अंडी, अर्धा कांदा, लाल मिरची, मीठ, तूप, हिरवी कोथिंबीर.

कृती..अंडी फोडून चांगली फेटून घ्यावीत. त्यात मग मीठ, मिरची पावडर, बारीक कापलेला कांदा व हिरवी कोथिंबीर घालायची. दोन्ही ब्रेड हाताने चुरून अंडय़ाच्या द्रावणात मिसळावे. चमच्याने फेटून मिश्रण एकजीव करावे. नॉनस्टिक फ्राइंग पॅन गॅसवर ठेवून त्यात दोन चमचे तूप टाकावे. तूप गरम झाले की त्यात मिक्स केलेले अंडय़ाचे द्रावण टाकून गोलाकार पसरावे. थोडा वेळ शेकल्यानंतर वरून तूप लावून परतून घ्यावे. दोन्ही बाजूने तांबूस होईपर्यंत शेकून घ्यावे. तयार झालेल्या आम्लेटचे चार ते पाच तुकडे करून टोमॅटो सॉस सोबत खायला द्यावे.

 

आपली प्रतिक्रिया द्या