दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता

8

सामना प्रतिनिधी । नांदेड

दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात येत्या तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, याठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता एमजीएमच्या खगोल व अंतराळ विज्ञान केंद्राचे प्रमुख श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.

सध्या मध्य महाराष्ट्र प्रदेशावर दिवसभर वातावरण ढगाळ रहात असून येत्या दोन तीन दिवस यात आणखी वाढच अपेक्षित आहे. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या पश्चिमेकडे एक चक्रवात निर्माण होत आहे. याचे येत्या दोन दिवसांत चक्रिय कमी दाबाचे क्षेत्रात रूपांतर होईल असे दिसते आहे व हे पश्चिमे उत्तर दिशेला अरबी समुद्राच्या दिशेला दिनांक १४-१५ मार्च दरम्यान सरकेल. याचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ भागात हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.

उन्हाळा सुरू होऊन महिना होऊन गेला. सध्या ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानात घट झाली असल्याने पहाटेच्या वेळी थंडी जाणवत आहे. सध्याच्या पश्चिमी विक्षोपीय वाऱ्यांचा अभ्यास केला असता हे वारे उत्तर गोलार्धात आता ही सक्रिय असून त्याचा परिणाम आपल्याकडे या पावसादरम्यान काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही दिसते आहे.

गुडी पाडव्याच्या काळात हे ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानावर याचा परिणाम होईल व यावर्षीचा उन्हाळा सुसह्य राहील असे दिसते आहे. याचा परिणाम येत्या पावसाळ्यात आपल्या प्रदेशात (पुर्व मराठवाडा/ विदर्भ / तेलंगणा) पावसाचे प्रमाण ही कमी असण्याचे संकेत मिळत असल्याचे श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या