जे. जे. रुग्णालय परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवा! अतिवृष्टीतील गैरसोय टाळण्यासाठी आदित्य ठाकरे यांना निवेदन

मुंबईत अतिवृष्टी झाल्यास भायखळा येथील जे.जे. रुग्णालय परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिक-रुग्ण-नातेवाईकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे जेजे रुग्णालय परिसरात  रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवा अशी मागणी शिवसेना नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी केली आहे. याबाबत जामसुतकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्य़ांना कार्यवाहीचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे.

भायखळा येथील जेजे रुग्णालयात केवळ मुंबईतूनच नव्हे तर राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्य़ातून दररोज शेकडोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र अतिवृष्टी झाल्यास जेजेच्या परिसरात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. यावर्षी तर 5 ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या तळमजल्यावर पाणी साचण्याचा प्रकार घडला. अशा प्रकारांमुळे नागरिक-रुग्णच नाही तर जेजे रुग्णालयाचे डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्य़ांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय रुग्णालय परिसरात पाणी साचल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ‘जेजे’च्या संपूर्ण परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवावा अशी मागणी नगरसेविका सोनम जामसुतकर, माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.  हा प्रकल्प राबवल्यास रुग्णालय परिसरात वास्तव्यास असलेले डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांच्या निवासी इमारतींना साठवणूक केलेले पाणी पुनर्वापराकरिता उपयोगी ठरणार आहे, असेही जामसूतकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या