औषधी आणि गुणकारी रानभाज्या

<<डॉ. अनुजा पटेल, आहारतज्ञ >>

पाऊस म्हणजे आनंद. सर्जनाचा सोहळा. पावसाचे हे सृजनत्व आपल्याला भरभरून दान देत असते. पावसाळ्यातील सगळ्यात मोठे आणि आरोग्यपूर्ण निसर्ग दान म्हणजे रानावनातच मिळणाऱया रानभाज्या…

असं म्हणतात आपल्या मातीत जे जे पिकतं ते आपण खावं. ऋतुमानातल्या बदलामुळे रोगराई पसरते हे जरी खरं असलं, तरी निसर्ग मात्र त्यावरील ‘औषध’सुद्धा आपणास देत असतो. पावसाळी हवामानात वाढणाऱया निरनिराळ्या पालेभाज्या व रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. गरज आहे ती त्या योग्य प्रकारे आहारात समाविष्ट करून घेण्याची.बहुतांशी डोंगराळ भागात राहणारे आदिवासी या भाज्या गोळा करतात व जवळपासच्या त्या गावात – शहरात जाऊन विकतात. आरोग्याला पोषक असणाऱया अशाच काही भाज्यांची आपण ओळख करून घेऊ.

 मायाळू

मायाळूचा वेल बागेत, अंगणात अगदी कुंडीतसुद्धा लावता येतो. अतिशय औषधी गुणधर्म असलेली ही वेल कोकणात सर्वत्र आढळते. ‘थंड’ गुणधर्माची ही भाजी पित्तशामक आहे. पचनास अतिशय हलकी असल्यामुळे पावसाळी वातावरणासाठी अतिशय उपयुक्त आहे. सांधेदुखीसाठीसुद्धा ही भाजी गुणकारी आहे. पित्त उठले तर मायाळूचा रस अंगावर चोळतात.

शेवळा

शेवळा ही कंदवर्गीय वनस्पती आहे. याला जंगली सुरण असेही म्हणतात. शेवळा ही प्रथिने व कॅल्शियमयुक्त भाजी आहे. शेवळाचा कंद व कोवळ्या पानाची भाजी करतात. कंदाची पाने दूध व साखर घालून शिजवून खातात. शेवळा खाजरा असतो म्हणून त्यासोबत काकड या वनस्पतीची आंबट फळे घालून भाजी करतात. शेवळाचा कंद अनेक औषधांमध्ये वापरला जातो.

टाकळा

पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला व उघडय़ा माळरानावर सहज उगवणारी ही भाजी. उग्र वास असलेली ही भाजी ‘अ’ जीवनसत्त्वाची परिपूर्ण आहे. दिसायला साधारण मेथीसारखी असणारीही पालेभाजी खूपच गुणकारी आहे. थोडीशी कडू असणारी ही भाजी पचनास हलकी असते. टाळक्याच्या पानांचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात. या भाजीला ‘तखटा’ असेही म्हणतात.

 आघाडा

आघाडा ही रोपवर्गीय वनस्पती… हरितालिका पूजेत आघाडय़ाच्या पत्रीला विशेष महत्त्व आहे. या भाजीमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते; त्यामुळे रातांधळेपणाचा त्रास असणाऱयांना आघाडय़ाचे चूर्ण देतात. ही भाजी ‘पाचक’ असून मूतखडा, मूळव्याध व पोटदुखीवर गुणकारी. आघाडा रक्तवर्धक आहे व हाडे बळकट होण्यासाठी तो खावा.

 करटोली

करटोली किंवा कंटोळा ही भाजी डोंगराळ भागात आढळते. कारल्यासारखी दिसणारी छोटी छोटी ‘फळं’ अतिशय औषधी आहेत. क्रोनिक हेडेक दूर करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे. रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी करटोली गुणकारी आहेत. या फळभाजीमध्ये खूप बिया असतात. ही भाजी फायबर रीच आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या