मलाही राज कुंद्राच्या प्रॉडक्शन हाऊसकडून ऑफर आली होती! अभिनेत्री मनीषा केळकरने केला गौप्यस्फोट

पॉर्नोग्राफीप्रकरणी उद्योगपती राज कुंद्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कुंद्राच्या अटकेनंतर याप्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. यातच आता अभिनेत्री मनीषा केळकर हिने राज कुंद्रा याच्या प्रॉडक्शन हाऊसकडून आपल्याला ऑफर आली होती, मात्र प्रॉडक्शन हाऊसकडून माझ्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे आपण ही ऑफर नाकारली होती, असा गौप्यस्फोट केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनीषा केळकर म्हणाली, राज कुंद्राच्या कंपनीतील कास्टिंग डायरेक्टरने माझ्याशी संपर्क साधत माझ्याकडे काही फोटोंची मागणी केली होती तसेच व्हिडीओ शूट करावे लागतील असे सांगितले होते. या फोटो शूट आणि व्हिडीओची काही थीम आहे का, असे मी त्यांना विचारले होते, मात्र मला त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. फक्त एका साईटवर फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले जाणार ही कल्पनाच विचित्र वाटल्याने आपण ही ऑफर नाकारल्याचे तिने सांगितले आहे. तसेच कामाबद्दल बोलताना न्यूड किंवा अडल्ट कंटेंट याबद्दल काहीही बोलणे झाले नसल्याचेही तिने मुलाखतीत सांगितले आहे. ज्या नंबरवरून आपल्याला कॉल आला होता त्या मोबाईल नंबरचा तपास केला असता तो नंबर नायजेरियाचा असल्याचे लक्षात आल्याचे तिने सांगितले. अशा प्रकरणांपासून दूर राहण्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे असेही ती म्हणाली.

आर्म्स प्राईम मीडिया कंपनीच्या कुशवाह याची चौकशी

पॉर्न फिल्मप्रकरणी गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने आर्म्स प्राईम मीडिया प्रायव्हेड लिमिटेडचे सौरभ कुशवाह यांची बुधवारी चौकशी केली. कुशवाह यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. पॉर्न फिल्म प्रकरणात राज कुंद्रा याला अटक झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेची प्रॉपर्टी सेल या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढत आहे. या प्रकरणात आर्म्स प्राईम मीडिया प्रायव्हेड लिमिटेड या कंपनीचादेखील महत्त्वाचा सहभाग असल्याचे चौकशीत समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी आज या कंपनीचा सौरभ कुशवाह याला चौकशीसाठी बोलावले होते. बराच वेळ चौकशी केल्यानंतर कुशवाह याला सोडण्यात आले. मात्र त्याला गुरुवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या