अश्लील उद्योग कंपनीचा राज कुंद्रा कसा अडकला? वाचा सविस्तर बातमी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) हा उद्योगपती असल्याचे सांगायचा. त्याचे सगळे उद्योग मुंबई पोलिसांनी शोधून काढले आहेत. कुंद्रा हा अश्लील उद्योग कंपनीमुळे (Porn Industry) मालामाल झाल्याचं आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आलं आहे. लंडनस्थित भावोजीच्या सहकार्याने ‘हॉटशॉट्स’ (HotShots) अॅपच्या माध्यमातून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याने पॉर्न फिल्मचा उद्योग केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कुंद्राच्या कार्यालयात पॉर्न फिल्म्सबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यानंतर त्याला व त्याच्या कंपनीचा आयटी प्रमुख रायन थॉर्प याला सोमवारी रात्री अटक केली होती. मंगळवारी दोघांना कोर्टात हजर केले असता त्यांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

राज कुंद्रा पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला हे अनेकांना माहिती नाहीये. पोलिसांनी राज कुंद्राला अचानक उचलला नसून त्याच्यावर ते बऱ्याच दिवसांपासून लक्ष ठेवून होते. 4 फेब्रुवारीला एका तरुणीने मालवणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. चित्रपटांत आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मालिकांमध्ये काम मिळवून देतो असं सांगून तरुणींकडून अश्लील चित्रपटांत काम करवून घेतलं जात असल्याचं या तरुणीने पोलिसांना सांगितलं होतं. या चित्रपटांचे चित्रीकरण मुंबईच्याच आसपास होत असून हे चित्रपट बनवणारे बक्कळ कमाई करत असल्याचंही तिने सांगितलं होतं. या तक्रारीनंतर पोलिसांनी मालाडमध्ये एका बंगल्यावर छापेमारी केली. हा बंगला भाड्याने घेण्यात आला होता आणि तिथे पॉर्न फिल्मचं चित्रीकरण केलं जात होतं.

छापेमारी दरम्यान पोलिसांनी 11 जणांना अटक केली होती. या आरोपींमध्ये एका बॉलीवूड अभिनेत्रीचाही समावेश होता. त्याचवेळी पोलिसांना या सगळ्या प्रकरणात राज कुंद्रा याचाही समावेश असल्याचं कळालं होतं. मात्र त्याला अटक करण्यापूर्वी सगळे पुरावे जमा करणं गरजेचं होतं, आणि पोलिसांनी तेच केलं. पुरावे गोळा करत असताना पोलिसांनी पीडित मुलींचे लेखी जवाब घेतले. पोलिसांनी व्हॉटसअप चॅट, App वरील सगळे पॉर्न चित्रपटची यादीही मिळवली.

राज कुंद्रा या धंद्याकडे का वळाला याचाही पोलीस शोध लावत आहेत. पोलिसांना असं वाटतंय की बेसुमार पैशांच्या लालसेपोटी त्याने ही अश्लील उद्योग कंपनी चालवायला सुरु केली. जगभरातील पॉर्न इंडस्ट्रीची उलाढाल ही 740 हजार कोटींच्या घरात असल्याचं एका अहवालात म्हटलंय. सर्वसाधारणपणे पॉर्न बघणारी माणसे 10 मिनिटे या वेबसाईटवर असतात, हिंदुस्थानात हे प्रमाण सरासरी 8 मिनिटांच्या आसपास आहे. पॉॉर्न बघण्यात अमेरिकेची मंडळी आघाडीवर असून जपान तिसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या आणि कॅनडा चौथ्या क्रमांकावर आहे.

मालवणीच्या मढ येथे पॉर्न फिल्म बनवल्या जात असल्याची तक्रार आल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने त्या ठिकाणी कारवाई केली होती. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रॉपर्टी सेलने तपास करीत नऊ जणांना अटक केली होती. दरम्यान, अधिक तपासात या अश्लील कारभारात उद्योजक राज कुंद्रा याचा सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रभारी निरीक्षक शशिकांत पवार, निरीक्षक किरण बिडवे, एपीआय नागेश पुराणिक, सचिन कदम, उपनिरीक्षक आण्णासाहेब गादेकर तसेच किरण जगताप, आनंदा गेंगे, सुनील कांगणे, शरद मुकुंदे, नयना पाटील, रंजना निचिते या पथकाने या गुह्यातील आरोपी उमेश कामत याची अधिक चौकशी केली असता लंडन येथील केनरीन प्रा. लि. कंपनीचा मालक प्रदीप बक्षी असून तो राज कुंद्रा याचा भावोजी आहे. राज पुंद्रा याने प्राईम मीडिया प्रा. लि. ही कंपनी स्थापन करून केनरीन या कंपनीसाठी ‘हॉटशॉट्स’ हे अॅप विकसित केले आणि ते त्यांना विकल्याचे समोर आले. राज कुंद्रा याने त्याच्या विहान कंपनीचा आयटी प्रमुख रायन थॉर्प याची यासाठी मदत घेतली होती. या अश्लील उद्योगातून कुंद्रा व अन्य आरोपींनी मोठी आर्थिक उलाढाल केल्याचे पोलिसांच्या हाती लागलेल्या महत्त्वाच्या बाबीतून निष्पन्न झाले आहे. ‘हॉटशॉट्स’च्या तपासणीत अनेक अश्लील व्हिडीओ आढळून आले. प्रदीप बक्षी हा या गुह्यातील आरोपी असून तो फरार आहे.

…तरीही कुंद्राच्या कंपनीला आर्थिक लाभ

राज कुंद्रा याने त्याच्या आर्म्स प्राईम मीडिया कंपनीच्या मार्फत लंडनस्थित केनरीन कंपनीला ‘हॉटशॉट्स’वर अश्लील चित्रफीत अपलोड करण्याची जबाबदारी दिली होती. काही दिवसांनंतर कुंद्राने कंपनीतील पदाचा राजीनामा दिला. मात्र तरीदेखील त्याच्या विहान कंपनीच्या बँक खात्यांवर परदेशातून कोटय़वधीची रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम कशी आली याचा पोलीस शोध घेत आहेत.

आणखी ओटीटी रडारवर

राज कुंद्राच्या ‘हॉटशॉट्स’प्रमाणे ‘हॉटहिट’, ‘न्यूफिल्क्स’ आदी ओटीटी अॅपवरही अश्लील फिल्म आणि वेबसीरिज दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ते ओटीटी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या अश्लील उद्योगाशी संबंधित काही बँक खात्यातील साडेसात कोटींची रोकड गोठवण्यात आली असल्याचे सहआयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले.

पॉर्न फिल्म प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत यास्मिन खान, प्रतिभा नलावडे, मोनू जोशी, भानुसूर्यम ठाकूर, आतिफ नसीर अहमद सैफी, वंदना तिवारी, उमेश कामत, दिपंकर खासनाविस, तन्वीर हाशमी, राज कुंद्रा आणि रॉयन थॉर्प अशा 11 जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी फरार आरोपी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
अश्लील उद्योगाचा कारभार गुपचूप करण्यासाठी राज कुंद्रा याने व्हॉट्सअॅपचा आधार घेतला होता. त्याने व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करून त्यावर तो आपल्या सहकाऱयांशी चॅट करत होता. त्या ग्रुपवरील शेकडो चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या