राजा कारळे

22
राजा कारळे

>> प्रशांत गौतम

राजा कारळे

बालरंगभूमीचा आधारवड अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांच्या निधनापाठोपाठ ज्येष्ठ नाट्य़ समीक्षक राजा कारळे गेले. कारळे हे बालरंगभूमी आणि कामगार रंगभूमीवर सातत्याने सक्रिय होते. नाट्य़वर्तुळात राजाभाऊ नावाने ओळखले जाणारे कारळे अभिनेते आणि ज्येष्ठ समीक्षक होते. लिटील थिएटरच्या प्रणेत्या सुधाताई करमरकर यांच्यासोबत त्यांनी अनेक बालनाट्य़ांतून आपला ठसा उमटविला. रंगभूमीवर अभिनेता म्हणून काम करणे वेगळे आणि एखाद्या नाटकाचे समीक्षण करणे वेगळे. या दोन्ही बाबींचा सुवर्णमध्य राजाभाऊंच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होता. तब्बल ३५ वर्षे एका प्रथितयश दैनिकामध्ये नाट्य़ क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घडामोडी, नवी-जुनी नाटके, कलावंतांचा अभिनय, नेपथ्य, सादरीकरण अशा विविध बाबींवर ते परखड भाष्य करीत असत. वेळोवेळी त्यांनी नाट्य़ समीक्षा लिहिण्याचे मोठे योगदान दिले आहे. राजाभाऊंचा ९०व्या वर्षीही उत्साह तरुण रंगकर्मींना लाजवेल असाच होता. या वयापर्यंत त्यांनी अनेक नाट्य़संमेलनांस आवर्जून उपस्थिती लावून आनंद घेतला. राजाभाऊंनी ‘अश्वमेध, स्टील फ्रेम, असाही एक अभिमन्यू, महापुरुष, पाषाणपालवी या पाच नाटकांचे प्रामुख्याने लेखन केले. त्यातील महापुरुष आणि पाषाणपालवीचा, नाट्य़गौरव पुरस्काराने सन्मान झाला होता. प्रख्यात नाट्य़ दिग्दर्शिका विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटकांतून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. पडद्यावर भूमिका गाजवणारे कलावंत उत्तम अभिनय करून नाट्य़ रसिकांची दाद मिळवतात आणि ते नाट्य़ रसिकांच्या लक्षात राहतात. तसे पडद्यामागे विविध भूमिका करणारे कलावंत कधीच रसिकांसमोर येत नाहीत. एखादी नाट्य़कृती रंगमंचावर सादर करण्यासाठी लागणाऱ्या अनेक बाबी या अप्रकाशित असतात. तद्वतच अनेक नाटकांच्या बाबतीमध्ये राजाभाऊंनी पडद्यामागची भूमिका वठविली.

आपली प्रतिक्रिया द्या