शिवसेना भाजप युतीचे राजन वराडकर यांची मालवण उपनगराध्यक्षपदी  निवड 

24

सामना ऑनलाईन । मालवण प्रतिनिधी 

मालवण पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना-भाजप युतीचे  नगरसेवक राजन वराडकर यांची बिनविरोध निवड गुरुवारी (२९) करण्यात आली. तर स्वीकृत नगरसेवक म्हणुन युतीकडून शिवसेनेचे नितीन वाळके व आघाडीकडून कॉंग्रेसचे दिपक पाटकर यांचीही बिनविरोध निवड झाली.
शिवसेना-भाजप युतीच्या गट स्थापनेपासुन दूर राहिलेल्या नाराज भाजप नगरसेविका पूजा करलकर यांनी निवड प्रक्रिया सभेस उपस्थित राहत उपनगराध्यक्ष पदासाठी वराडकर यांना पाठींबा दर्शवला. पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, युतीचे गटनेते गणेश कुशे, नगरसेवक पंकज सादये, आप्पा लुडबे, सेजल परब, तृप्ती मयेकर, सुनिता जाधव, आकांक्षा शिरपुटे, पूजा करलकर, पूजा सरकारे, आघाडीचे गटनेते मंदार केणी, जगदीश गावकर, यतिन खोत, दर्शना कासवकर, शिला गिरकर, ममता वराडकर आदी सर्व नगरसेवक उपस्थित होते.
युतीच्या सत्तेच्या फॉर्मुल्या नुसार उपनगराध्यक्ष पद हे भाजपच्या वाट्याला आले. अश्या स्थितीत १० सदस्यांच्या पाठींब्यावर राजन वराडकर यांचा एकमेव अर्ज उपनगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आला. अर्ज छाननी अंती नगराध्यक्ष कांदळगांवकर यांनी वराडकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. २०१४ पासुन उपनगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करणारे वराडकर हे दुसऱ्यांदा पालिकेचे उपनगराध्यक्ष बनले. यावेळी पालिका परिसरात गर्दी केलेल्या शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी युतीकडून शिवसेनेच्या वतीने नितीन वाळके व आघाडीकडून कॉंग्रेसचे दिपक पाटकर यांचे नामनिर्देशन अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे स्वीकृतपदाच्या निकषांच्या पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. गुरुवारी (२९) दोन्ही अर्ज स्वीकृतसाठी पात्र असल्याची मोहर जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे पत्र प्राप्त होताच. पाटकर व वाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. २००७ व २०११ च्या पालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातून दोनवेळा स्वीकृत नगरसेवकाचा कार्यकाल पूर्ण करणारे वाळके हे या निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातून तिसऱ्यांदा स्वीकृत नगरसेवक बनले. त्यानंतर तालुकाप्रमुख बबन शिंदे यांनी वाळके यांच्या हाती शिवबंधन बांधले.
निवड प्रक्रियेनंतर गटनेते मंदार केणी, गणेश कुशे, सुदेश आचरेकर, पूजा करलकर, यांनी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचे अभिनंदन केले. तर आचरेकर यांनी युतीचे वराडकर, वाळके यांचासह नगराध्यक्ष कांदळगांवकर यांचे विशेष कौतुक केले. निवडीनंतर भाजपचे संदेश पारकर, बाबा मोंडकर, बबलू राऊत, भाऊ सामंत, धोंडी चिंदरकर, संतोष गावकर, पंकज पेडणेकर, शिवसेनेचे बबन शिंदे, हरी खोबरेकर, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, संमेश परब, तपस्वी मयेकर, देवयानी मसुरकर, दीपा शिंदे यांनी तसेच अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
आपली प्रतिक्रिया द्या