रजनी करकरे-देशपांडे

शीतल धनवडे

वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओमुळे आलेल्या शारीरिक अपंगत्वावर मात करत कलानगरी करवीरमधूनच गायन आणि सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱया रजनीताई यांच्या कायमचे निघून जाण्याने सुगम संगीत व दिव्यांगांच्या विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेतील फडणीस बोळात राहणारे जयेंद्र करकरे यांच्या त्या कन्या. त्यांना दोन भाऊ होते. कवयित्री मीरा सहस्रबुद्धे या त्यांच्या बहीण.  स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच त्यांना पोलिओने धक्का दिला. मात्र जगण्याची ऊर्मी बाळगून राजमाता जिजामाता हायस्कूलमध्ये शालेय आणि गोखले महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी घेतले. जिद्दीने शिक्षण घेत गायन शिकणाऱया रजनीताईंचे गाणे ऐकण्यासाठी त्यावेळी आसपासच्या महाविद्यालयांतून अनेक विद्यार्थी स्नेहसंमेलनासाठी येत असत. प्राचार्यांनी त्यांचे वर्गही नेहमीच तळमजल्यावर भरवून शिक्षणास हातभार लावला. याचवेळी संगीत, साहित्यात रुची असलेल्या
पी. डी. देशपांडे यांच्याशी त्यांची मैत्री झाली. त्याचे रूपांतर पुढे जन्माचे साथीदार होण्यात झाले. गझलांची आवड असल्याने उर्दू भाषेतील उच्चार अधिक चांगले व्हावेत यासाठी घरीच सर्वांसाठी उर्दूचे वर्ग सुरू केले होते. येथेच या दोघांची मने जुळली. घरच्यांचा विरोध डावलून रजनीताईंनी पी. डी. यांच्याशी विवाह केला. वयाच्या पाचव्या वर्षी १५ ऑगस्टला पोलिओ झाला आणि पुढे १५ ऑगस्ट रोजीच पी. डी. देशपांडे यांच्याबरोबर विवाह झाल्याने हा दिवस आपल्यासाठी नवा स्वातंत्र्यदिन असल्याचेच रजनीताईं नेहमी सांगायच्या. एकमेकांना समजावून घेत बहरलेला रजनीताई आणि पी.डी. यांचा संसार १९८९ मध्ये नांदेडमधून पुन्हा कोल्हापूर येथे आला. दोन्ही घरांचा विरोध तोपर्यंत मावळल्याने हेल्पर्स ऑफ हॅण्डीकॅप्ड व कलांजली संस्थेच्या माध्यमातून सक्रिय होत रजनीताईंनी संगीत आणि सामाजिक क्षेत्रासाठी आपले जीवन वाहिले. ३० वर्षांहून अधिक काळ आकाशवाणी पुणे, संभाजीनगर, सांगली आदी केंद्रावरून त्यांनी आपल्या बहारदार गायनाचे कार्यक्रम सादर केले. विविध संस्थांच्या निमंत्रणावरून कित्येक मैफली केल्या. ‘आनंदाचे डोही’ या त्यांच्या कार्यक्रमाचे राज्यात एक हजारहून अधिक प्रयोग झाले. ‘वरात’, ‘हे दान कुंकवाचे ’, ‘दैवत’ आदी सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. स्व. राज कपूर यांच्या उपस्थितीत त्यांनी गीतगायन केले होते. १९८४ मध्ये नसिमा हुरजूक यांच्यासह दिव्यांगांसाठी एक संस्था काढली. पुढे बाबूकाका दिवाण यांच्या प्रेरणेतून त्यांनी कोल्हापुरात ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप्ड ’ या संस्थेची त्यांनी स्थापना केली. ही संस्था आज नावाजली आहे. गेली ३० वर्षे या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून त्या काम पाहत होत्या. या माध्यमातून त्यांनी अनेक मुलांचे पुनर्वसन केले. कित्येक दिव्यांगांना जगण्याची प्रेरणा दिली. सुचित्रा मोर्डेकर यांच्याबरोबर ‘कलांजली’ संस्थेची स्थापना करून सुगम संगीत मार्गदर्शनाचे १६ वर्षांहून अधिक काळ वर्ग चालविले. महागायक अभिजित कोसंबी, प्रसन्नजित कोसंबी, शर्वरी जाधव आदी शिष्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. वय वर्षे सात ते सत्तरी ओलांडलेले अनेक शिष्य संगीत शिकण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. मॅडम, ताई, बाई अशा नावाबरोबरच भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे प्रति आशा म्हणूनही त्यांना संबोधण्यात येत असे. शारीरिक अक्षमता असणाऱया लग्नाळू मुला-मुलींसाठी वधू-वर सूचक केंद्रही त्यांनी चालविले. आपल्या स्पष्ट आणि करारी बाण्यामुळे त्यांनी अनेकांचे संसार यातून फुलवले. श्वसन यंत्रणेतील बिघाडामुळे  येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. ‘जग बदलतेय… अपेक्षा वाढतायेत… त्यातून कुरबुरी वाढतायेत… पण झाले गेले विसरून पुढे पुढे चालावे’ असा मंत्र देणाऱया रजनीताई कलानगरीत जिद्दीची लढाई आणि संगीताची सेवा या स्मृती कायम ठेवून गेल्या.