राजापूरात घरफोडी, पावणे पाच लाखांचा ऐवज लांबविला

theft cirme
प्रातिनिधिक फोटो

शहर बाजारपेठेतील मधीलवाडा येथील पै. अकबर ठाकूर यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरटयांनी सुमारे ४ लाख ७४ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबविल्याची घटना घडली आहे. भर वस्तीत झालेल्या या चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

चोरट्यांनी बंद घर फोडून चार लाख ५० हजार रूपयांचे सोन्याचे दागिने, चार हजार रूपयांचे चांदीचे दागिने व रोख रक्कम रूपये २० हजार असा ऐवज  लांबविला आहे. पोलिसांना चोरीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले असून तात्काळ श्वान पथक व ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले. या बंद घराचा पुढचा व मागचा दरवाजा फोडून अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश करून घरातील तळमजल्यावरील व वरच्या मजल्यावरील दोन कपाटे फोडून हे दागिने व रोकड लांबविली आहे.

या प्रकरणी पै. अकबर ठाकूर यांच्या कन्या खुर्शीद अकबर ठाकूर यांनी राजापूर पोलीसांत तक्रार दिली आहे. अकबर ठाकूर यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही कन्या या ठिकाणी रहातात. मात्र त्या काही वेळा त्या लगतच असलेल्या त्यांचे बंधू अशफाक ठाकूर यांच्या निवासस्थानी वास्तव्यास असतात.

सोमवारी दुपारी या कु. खुर्शीद व त्यांची बहिण आपले घर बंद करून अशफाक ठाकूर यांच्याकडे रहाण्यासाठी गेले होते. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान कुरशीद या आपल्या घरी आल्या असताना त्यांना घराच्या पुढील दरवाजाची कडी वाकलेल्या आणि तोडलेल्या अवस्थेत होती. त्यांनी तात्काळ याबाबत लगतच असलेल्या बंधू शहनाज ठाकूर यांना माहिती दिली. ठाकूर यांनी तात्काळ राजापूर पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी अज्ञात चोरटयाच्या विरोधात भा. द. वि. कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष वालावलकर करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या