राम मंदिर भूमीपूजनाच्या मुहूर्तावर 50 मुस्लिम कुटुंबातील 250 सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म

3803

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी प्रभू श्रीराम मंदिराचे विधिवत भूमिपूजन पार पडले. याच शुभ मुहूर्तावर राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोतीसरा गावातील 50 मुस्लिम कुटुंबातील 250 सदस्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. आमचे पूर्वज हिंदू होते, मात्र मोगल काळात तलवारीच्या बळावर धर्मपरिवर्तन करण्यात आले. मात्र आम्ही पूर्वी हिंदूच होतो याची जाणीव झाल्याने पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला असे या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितले. तसेच यासाठी आपल्यावर कोणी दबावही टाकला नाही, असेही त्यांनी सांगितले.

हिंदू धर्माचा स्वीकार करणाऱ्या सुभनराव यांनी सांगितले की, मोगल काळात मुस्लिमांनी आमच्या पूर्वजांना धमकावून, तलवारीच्या बळावर त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला होता. मात्र आम्ही हिंदू रीतिरिवाज पाळत असल्याने मुस्लिमही आमच्यापासून लांब रहायचे. आपले पूर्वज हिंदू होते याची जाणीव झाल्यानंतर आम्ही खूप विचार केला आणि पुन्हा हिंदू धर्मात विधिवत यज्ञ करून, जानवे घालून प्रवेश केला. यावेळी जवळपास 50 कुटुंबातील 250 लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला.

हिंदू सण-वार यांचे पालन
गावातील रहिवासी हरजी राम यांनी सांगितले की, गावातील हे सर्व कुटुंब अनेक वर्षांपासून हिंदू रीतिरिवाज, सण-वार यांचे पालन करत होते. प्रत्येक वर्षी हिंदू सण साजरे करत होते. कधीही मुस्लिम रीतिरिवाज याचे पालन झाले नाही. औरंगाजेब याच्या काळात आपल्या पूर्वजांचे बळजबरीने धर्मांतर झाल्याचे तरुणांच्या मनावर कोरले गेले आणि त्यांनी हिंदू धर्म स्वीकार करायचा निर्णय घेतला. या सर्व कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयाचे गावकऱ्यांनी देखील स्वागत केले आहे. याबाबत ‘न्यूज 18 लोकमत’ने वृत्त दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या