राजस्थानात भाजपला बंडखोरीचे टेन्शन, दोन दिवसांत 18 आमदारांना गुजरातमध्ये हलवले

4396
ashok-gehlot

राजस्थानातील सत्तानाटय़ाला नवीन वळण मिळाले आहे. आमदारांची फोडाफोडी करून सत्तेचे स्वप्न पाहिलेल्या भाजपचीच आता बंडखोरीच्या टेन्शनने झोप उडाली आहे. शुक्रवारी डझनभर आमदारांना अहमदाबादमध्ये हलवल्यानंतर शनिवारी आणखी सहा आमदारांना पोरबंदरमध्ये नेले. 14 ऑगस्टला होत असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने सावधगिरीची ही खेळी केली आहे. भाजपच्या पायाखालची जमीन सरकल्याचीच जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सचिन पायलट गटातील आमदारांच्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार अडचणीत सापडले आहे. 14 ऑगस्टला विधीमंडळाचे अधिवेशन होत असून त्यात गेहलोत सरकारचे भवितक्य ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आधीच आपल्या 100 आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. त्यावर टीका करणाऱया भाजपने शुक्रवारी 12 आणि शनिवारी 6 आमदारांना गुजरातमध्ये हलवल्याने सत्तानाटय़ाला नवीन रंग चढला आहे. शनिवारी निर्मल कुमावत, गोपीचंद मीना, जब्बर सिंग संखला, धरमवीर मोची, गोपाल लाल शर्मा आणि गुरुदीप सिंग शाहपिनी या आमदारांना जयपूर विमानतळावरून चार्टर्ड विमानाने गुजरातला हलवण्यात आले. या आमदारांना आलिशान रिसॉर्टमध्ये ठेवले जाणार असून त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. 14 ऑगस्टपर्यंतच्या मुक्कामादरम्यान सोमनाथचे देवदर्शन घडवले जाणार आहे. हे आमदार प्रसंगी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पाठिंबा देऊ शकतात, अशी भिती भाजपला सतावत आहे.

काँग्रेस सरकारकडून आमदारांचा छळ!
तोंडघशी पडलेल्या भाजपने गेहलोत सरकारवर आरोप करीत स्वत:च्या खेळीचे समर्थन केले आहे. आमचे आमदार काँग्रेसच्या छळाला कंटाळून स्वेच्छेने देवदर्शनासाठी गुजरातला गेले आहेत. कॉग्रेस सरकार प्रशासन आणि पोलिस बळाचा गैरवापर करून छळवणूक करीत आहे. काँग्रेसचे नेते भाजपच्या नेत्यांचा छळ करताहेत, असा आरोप भाजपचे आमदार अशोक लाहोटी यांनी केला. जयपूर विमानतळाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते.

आपली प्रतिक्रिया द्या