चिखल लावा, शंख वाजवा, कोरोना टाळा; भाजप खासदाराचा अजब सल्ला

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. वैज्ञानिक कोरोनाची लस शोधण्य़ासाठी दिवस रात्र एक करत असताना भाजप खासदाराने मात्र कोरोनाला पळवून लावण्यासाठी एक अजब सल्ला दिला आहे. चिखलात बसून तो चिखल संपूर्ण अंगाला लावा व त्यावेळी शंख वाजवा. याने तुमच्या शरीरातली प्रतिकारक्षमता वाढेल असा दावा या खासदार महोदयांनी केला आहे. सुखबीर सिंग जौनापुरिया असे त्या भाजप खासदाराचे नाव असून त्यांचा चिखलात बसलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सुखबीर सिंग हे राजस्थानमधील टोंक सवाई मधोपूरचे खासदार आहेत. त्यांनी अंगाला चिखल फासून शंख वाजवताना व्हिडीओ रेकॉर्ड केला असून यात त्यांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी व शरीराची प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी हा उत्तम उपाय असल्याचा दावा केला आहे. याआधीदेखील त्यांनी 21 जून रोजी योगा दिना निमित्त शरीराला चिखल लावत योगा केला होता.

काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘भाभीजी पापड’ खाल्याने प्रतिकारक क्षमता वाढते असा दावा केला होता. त्य़ाआधी भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दररोज हनुमान चलिसा म्हणा व कोरोना पळवा असा सल्ला दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या