अमित शहांच्या आदेशाशिवाय राष्ट्रीय नेत्याच्या घरी पोलीस जाणं शक्य नाही – अशोक गेहलोत

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या घरी दिल्ली पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानाप्रकरणी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आहेत. ही कारवाई केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशाशिवाय होणं शक्य नसल्याची टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.

‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी जम्मू-कश्मीरमधील श्रीनगर येथे केलेल्या एका विधानाबाबत दिल्ली पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवून लैंगिक छळ पीडितांची माहिती मागवली होती. मात्र या नोटीसला कोणतेही उत्तर न मिळाल्याने रविवारी सकाळीच दिल्ली पोलिसांचे पथका राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झालं. दरम्यान, राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोलीस दाखल झाल्याची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी आले. परंतु पोलिसांनी त्यांना बाहेरच रोखले आणि घराबाहेर बॅरिकेट्स लावले. मात्र नंतर त्यांना परवानगी देण्यात आली.

या सगळ्या प्रकारावर माध्यमांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची प्रतिक्रिया विचारली. त्यावर गेहलोत म्हणाले की, हे ज्या पद्धतीने होतंय, ते पाहता राष्ट्रीय नेत्याच्या घरी पोलीस जाऊन थडकतील हे अमित शहा यांच्या आदेशाशिवाय, गृह मंत्रालयाच्या आदेशाशिवाय शक्य नाही. राहुल गांधी यांनी पोलिसांची नोटीस मिळाली असून त्याला लवकरच उत्तर देत असल्याचं कळवलं होतं. पण, तरीही ही कारवाई केली जात आहे. त्यांच्या घरात पोलीस घुसले आहेत. आज जे घडतंय ते सामान्य नाही. त्यांची इतकी हिंमत कशी झाली की आमच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याच्या घरी पोलीस विनाकारण घुसत आहेत. ते नोटीसीचं उत्तर द्यायला जात आहेत. तरीही हे प्रकार होत आहेत. संपूर्ण देश हे पाहतोय, त्यांना माफी मिळणार नाही, अशी टीका गेहलोत यांनी केली.